जिल्हाधिकाऱ्यांकडून मतदान केंद्राची पाहणी
बेळगाव: महानगरपालिकेच्या मतदानाचे काउंटडाऊन सुरू झाले आहे. त्यामुळे निवडणूक विभागाने मतदानाची सर्व तयारी केली आहे. या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी एम जी हिरेमठ यांनी मतदान केंद्राची पाहणी केली. विशेष म्हणजे वॉर्ड नंबर 8 मधील चव्हाट गल्लीतील शाळा नंबर 5 मध्ये जाऊन येथील परिस्थितीचा आढावा त्यांनी घेतला. बेळगाव महानगरपालिकेचे मतदान पहिल्यांदाच ईव्हीएम मशीन द्वारे केले जाणार आहे. त्यामुळे महानगरपालिकेच्या निवडणूक विभागाने जय्यत तयारी केली आहे. सध्या कोरोना आटोक्यात असला तरी धोका कायम आहे. कोरोना काळात मतदान होणार असल्याने प्रत्येक केंद्रावर योग्य ती खबरदारी घेतली जाणार आहे. त्यामुळे केंद्रावर मतदारांचे थर्मल स्क्रीनिंग,सॅनिटायजिंग करून प्रवेश देण्यात येणार आहे. याबाबतची पूर्वतयारी कशाप्रकारे चालली आहे याची पाहणी जिल्हाधिकारी एम जी हिरेमठ यांनी गुरुवारी दुपारी केली.