शाळा टिकविण्यासाठी माजी विद्यार्थ्यांचा पाठिंबा वकील अमर येळ्ळूरकरांना
बेळगाव :शहरात मराठी शाळा टिकली पाहिजे याकरिता मराठी शाळेचे माजी विद्यार्थी एकवटले आहेत. त्यामुळे वार्ड क्रमांक 8 मधील महाराष्ट्र एकीकरण समितीचे अधिकृत उमेदवार वकील अमर किसन येळ्ळूरकर यांच्या पाठीशी चव्हाट गल्ली येथील मुलामुलींची शाळा नंबर 5 च्या माजी विद्यार्थी संघाने पाठिंबा देण्याचा निर्धार केला आहे.
येथील चव्हाट गल्लीतील शाळा नंबर 5 चे प्रकरण सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित असताना सुद्धा शाळेच्या इमारतीची आणि जमिनीची बेकायदेशीर खरेदी केली गेली आहे. मुख्यता ही इमारत बेळगाव महानगरपालिकेची असून सुद्धा याकडे महापालिकेने दुर्लक्ष केले आहे. महानगरपालिकेत मराठी माणसाला काडीमात्र किंमत नसल्याने सदर समस्या उद्भवली आहे. त्यामुळे जर शहरातील मराठी शाळा टिकवायचा असेल तर महानगरपालिकेत मराठी माणसाचाच आवाज घुमला पाहिजे. याकरिता चव्हाट गल्ली येथील मराठी मुला-मुलींच्या शाळा नंबर 5 येथील माजी विद्यार्थी संघाच्या वतीने अमर येळ्ळूरकर यांना जाहीर पाठिंबा दिला आहे.
या मराठी शाळेचा निकाल मराठी माणसाच्या बाजूने लागला तरच शाळा नंबर 5 ही टिकू शकेल. मात्र त्यासाठी या वार्डातील नगरसेवक मराठी असणे अपेक्षित आहे. त्यामुळे माजी विद्यार्थी संघाच्या वतीने वकील अमर येळ्ळूरकर यांना भरघोस मतांनी विजयी करून देण्याचे आवाहन केले आहे.