बेळगाव:
विद्यार्थ्यांच्या जीवनातील महत्त्वाची परीक्षा म्हणून ओळखण्यात येणाऱ्या दहावी परीक्षेचा निकाल शुक्रवारी जाहीर झाला. या परीक्षेमध्ये बैलहोंगल तालुक्यातील देवलापूरची विद्यार्थिनी रूपा चनगौडा पाटील यांनी 625 पैकी 625 गुण संपादन करून अन्य 22 विद्यार्थ्यांसह राज्यात संयुक्तरित्या पहिला येण्याचा मान मिळवला आहे. राज्याचा निकाल 66.14 टक्के लागला आहे.
राज्यामध्ये निकालाच्या बाबतीत बेळगाव जिल्ह्याचा क्रमांक 25 वा लागला आहे. बेळगाव जिल्ह्यातून एकूण 31,503 विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली होती. त्यापैकी 19 हजार 583 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. त्यामुळे उत्तीर्ण होणाऱ्या एकूण विद्यार्थ्यांचे प्रमाण 62.16% आहे. निकालाच्या बाबतीत दक्षिण कन्नड जिल्हा प्रथम स्थानी असून उत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांचे प्रमाण 91.12% इतके आहे.https://dmedia24.com/national-football-player-sanvi-patil-first-at-sant-mira-school/
रूपाली पाटील हिने राज्यात तसेच बेळगाव जिल्ह्यात प्रथम येण्याचा मान मिळवला आहे. बेळगाव येथील सेंट जोसेफ स्कूलची विद्यार्थिनी निधी नंदकुमार कंग्राळकर हिने 625 पैकी 624 गुण घेऊन बेळगाव जिल्ह्यात दुसरा क्रमांक मिळवला आहे. कर्नाटक राज्य शाळा परीक्षा आणि मूल्यमापन मंडळाच्या वतीने शालेय शिक्षण मंत्री यांनी शुक्रवारी सकाळी दहावी परीक्षेच्या निकालाची अधिकृत घोषणा केली. त्यानंतर शिक्षण खात्याच्या वेबसाईटवर निकाल उपलब्ध करण्यात आला.
यावर्षीच्या दहावीच्या परीक्षेत मराठी माध्यमाचा निकाल 53.97% लागला आहे. राज्यातील सुमारे 144 शाळांचा निकाल शून्य टक्के लागला आहे. त्यामुळे पालक वर्ग , शिक्षण तज्ञ तसेच शिक्षकांमधून चिंता व्यक्त केली जात आहे. उत्तीर्ण होणाऱ्यांच्या प्रमाणामध्ये मुलांपेक्षा मुलींचे प्रमाण जास्त आहे. दहावी परीक्षेचा राज्यातील शहरे आणि ग्रामीण भागाचा विचार केला तर हे प्रमाण जवळपास सारखेच आहे. उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.