बेळगावात तीन दिवस चालणाऱ्या आंबा महोत्सवाला प्रारंभ झाला असून देवगड, मालवण, रत्नागिरी, वेंगुर्ले आणि कर्नाटकातील आंबे विक्रीसाठी ठेवण्यात आले आहेत.
शेतकऱ्यांना थेट ग्राहकांला आंबे विक्री करता यावेत या उद्देशाने गेल्या काही वर्षांपासून आंबा महोत्सवाचे फलोत्पादन खात्यातर्फे आयोजन करण्यात येत आहे. नैसर्गिकरित्या पिकवलेले आंबे येथे विक्रीसाठी ठेवण्यात आले आहेत.
पंचवीस पेक्षा अधिक जातींचे आंबे ग्राहकांना उपलब्ध करून देण्यात आले आहेत. यामध्ये कोकणातील हापूस आंबा सगळ्यांचे आकर्षण ठरला आहे. हापूस, केसर, तोतापुरी, माणकूर आणि अन्य आंब्यांची चव आंबा महोत्सवात चाखता येणार आहे. आंब्या बरोबरच नैसर्गिक मधाचे प्रदर्शन आणि विक्री मांडण्यात आली आहे.
जांबोटी, खानापूर येथील मध उत्पादकांनी शुद्ध मध विक्रीसाठी उपलब्ध केला आहे. याशिवाय आंबा महोत्सवात आंबा, लिंबू, पेरू, जांभूळ, चिकू आदी फळांची रोपटी देखील विक्रीसाठी ठेवण्यात आली आहेत. मागच्या वर्षी आंबा महोत्सवात शंभर टन पेक्षा अधिक आंब्याची विक्री झाली होती. यावर्षी मागच्या वर्षी पेक्षा अधिक आंब्यांची विक्री होईल अशी अपेक्षा फलोत्पादन खात्याच्या अधिकाऱ्यांनी व्यक्त केली आहे.