बेळगाव: जिल्ह्यातील महत्त्वाच्या योजनांवर लवकरात लवकर काम सुरू करण्याचा संकल्प मंत्री पदाची सूत्रे स्वीकारल्यापासून व्यक्त केला होता. त्याच्या प्रयत्नांच्या फलित म्हणून नोव्हेंबर महिन्यामध्ये नवीन जिल्हाधिकारी कार्यालयाचे बांधकाम सुरू होणार आहे, असे सार्वजनिक बांधकाम मंत्री जिल्हा पालकमंत्री सतीश जारकिहोळी यांनी सांगितले.
बेळगाव येथील बूडा कार्यालयात माध्यमप्रतिनिधींशी बोलताना मंत्री जारकिहोळी म्हणाले,”जिल्ह्याच्या विकासासाठी मी मंत्री पद ग्रहण केल्यापासून कार्यरत आहे. नवीन जिल्हाधिकारी कार्यालयाचे बांधकाम हे माझे स्वप्न होते, आज ते साकार होत आहे. या कामासाठी अंदाजे ३ वर्षे लागतील.
त्यांनी यावेळी स्मार्ट सिटी योजनेअंतर्गत पूर्ण झालेल्या काही इमारतींचा उल्लेख करताना सांगितले की,”कालच मुख्यमंत्री सिद्दरामय्या यांनी काही विकास कामांचे लोकार्पण केले आहे. आणखी काही कामे लवकरच पूर्ण होतील, त्यांचेही उद्घाटन करण्यात येईल.
“मंत्री जारकिहोळी यांनी कोयना जलाशयातून कर्नाटकाला पाणी सोडण्याबाबत म्हटले,”आम्ही प्रत्येक वेळी महाराष्ट्र सरकारकडे पाण्यासाठी विनंती करतो, परंतु आतापर्यंत महाराष्ट्र सरकारने कर्नाटकाला पाणी सोडलेले नाही. पावसाळ्यात आमच्या राज्यातून महाराष्ट्राच्या जत्त तालुक्यात पाणी सोडले तर उन्हाळ्यात ते कृष्णा नदीतून पाणी सोडण्यास तयार होतील. यासाठी सरकारी स्तरावर योजना आखणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले.”
ब्राह्मण समाजाने आयोजित केलेल्या आंदोलनात आ. अभय पाटील यांनी हजर राहून नेतृत्व केल्याबद्दल मंत्री जारकिहोळी यांनी प्रतिक्रिया देताना म्हटले, “CET परीक्षेच्या वेळी जानवे काढून घेण्यात आल्याच्या घटनेबद्दल सरकारवर टीका करणे योग्य नाही. ही खाजगी कॉलेजमधील घटना आहे, त्यामुळे सरकारवर आरोप ठेवणे चुकीचे आहे. आमदार अभय पाटील यांनी अनेक समस्यांबाबत आतापर्यंत आंदोलन केली नाहीत, शाळेसाठीही आवाज उठवला नाही. पण राजकीय हेतूने आता ते आंदोलनात सामील झाले आहेत.”
या कार्यक्रमात आमदार आसीफ (राजू) सेठ, बेळगाव बूडा अध्यक्ष लक्ष्मणराव चिंगळे यांच्यासह इतर जनप्रतिनिधी उपस्थित होते.