येळळूरमध्ये गुरुवारी आंतरराष्ट्रीय कुस्ती मैदान
शेरा पंजाब व मिर्झा इराण यांच्यात मुख्य लढत
बेळगाव:
येळ्ळूर येथील कुस्तीगीर संघटना आणि यात्रा कमिटी यांच्या वतीने येत्या गुरुवार दिनांक 24 एप्रिल रोजी महाराष्ट्र मैदान येथे आंतरराष्ट्रीय कुस्ती मैदानाचे आयोजन करण्यात आले आहे. या मैदानामध्ये महान भारत केसरी शेरा पंजाब आणि आंतरराष्ट्रीय मल्ल मिर्झा इराण यांच्यात प्रमुख लढत होणार आहे. श्री चांगळेश्वरी यात्रा उत्सवानिमित्त या कुस्ती मैदानाचे आयोजन दरवर्षीप्रमाणे करण्यात आले आहे.https://dmedia24.com/order-to-focus-on-strengthening-party-organizations/
शेरा पंजाब हा भारतातील एक नामवंत मल्ल आहे. तो बेळगावात येळ्ळूर येथील महाराष्ट्र मैदानामध्ये पहिल्यांदाच येत आहे. त्याचबरोबर आंतरराष्ट्रीय मल्ल मिर्झा इराण हा देखील पहिल्यांदाच या मैदानात उतरत आहे. त्यामुळे तमाम कुस्ती शौकिनांचे या खास लढतीकडे लक्ष लागले आहे.
या मैदानामध्ये दुसऱ्या क्रमांकाची कुस्ती डबल महाराष्ट्र केसरी सिकंदर शेख व भारत केसरी अमीन बेमिया जम्मू-काश्मीर यांच्यात होणार आहे. तिसऱ्या क्रमांकाची कुस्ती पुण्याचा शिवा महाराष्ट्र विरुद्ध हरियाणाचा रोहित यांच्यात तर चौथ्या क्रमांकाची कुस्ती राजू मलांगा विरुद्ध डबल कर्नाटक केसरी कार्तिक काटे यांच्यात होणार आहे.
या प्रमुख लढतीशिवाय मैदानामध्ये लहान मोठ्या अनेक ऐंशीहून अधिक चटकदार कुस्त्या होणार आहेत. येळ्ळूर कुस्ती मैदान एक नावाजलेले कुस्ती मैदान म्हणून ओळखले जाते. हे कुस्ती मैदान पाहण्यासाठी दरवर्षी लाखोच्या संख्येने कुस्ती शौकीन उपस्थित राहतात. त्यांच्या बसण्याची उत्तम व्यवस्था कुस्ती संघटनेकडून करण्यात येते. यावर्षी मैदानावर स्क्रीनची ही व्यवस्था करण्यात येणार आहे.