**शिंदोळी येथे २२ एप्रिलपासून श्री महालक्ष्मी,श्री दुर्गादेवी आणि श्री मसणाई देवी यात्रोत्सवाचे आयोजन**
बेळगाव तालुक्यातील शिंदोळी गावात ग्रामदेवता श्री महालक्ष्मी देवी, श्री दुर्गादेवी आणि श्री मसणाई देवी यांच्या यात्रोत्सवाचे आयोजन २२ एप्रिल ते ३० एप्रिल २०२५ या कालावधीत करण्यात आले आहे. यात्रेच्या यशस्वी आयोजनासाठी गावकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात तयारी केली आहे, अशी माहिती यात्रा समितीचे अध्यक्ष सतीश शहापूरकर यांनी दिली. https://dmedia24.com/invited-to-a-lecture-by-the-university-of-oxford-in-the-world-renowned-oxford/
कन्नड साहित्य भवन येथे आज झालेल्या पत्रकार परिषदेत शहापूरकर यांनी सांगितले की, या नऊ दिवसीय यात्रोत्सवाचा शुभारंभ २२ एप्रिल (मंगळवार) रोजी सकाळी ९ वाजता होईल. यावेळी बडेकोळ्ळमठ तारीहाळचे पूज्य श्री नागाप्पा महास्वामी आणि शरणमट्टीचे पूज्य श्री रुद्रय्या महास्वामी यांच्या सानिध्यात श्री महालक्ष्मी मंदिराचे उद्घाटन बेळगाव खासदार जगदीश शेट्टर यांच्या हस्ते केले जाईल. त्यानंतर देवीची ओटी भरण्याचा कार्यक्रम आणि सायंकाळी ४ वाजता रथातर्पण होईल.
२३ एप्रिल (बुधवार) रोजी सकाळी ८ वाजता रथोत्सवाला सुरुवात होईल. यावेळी महिला व बालकल्याण मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर आणि विधानपरिषद सदस्य चन्नराज हट्टीहोळी यांच्या हस्ते रथोत्सवाचा शुभारंभ होईल. कारंजीमठ बेळगावचे श्री गुरुसिद्ध महास्वामी आणि हुक्केरीचे श्री चंद्रशेखर शिवाचार्य महास्वामी यांचे सानिध्यही यावेळी लाभेल. सायंकाळी श्री महालक्ष्मी देवी गदगेवर विराजमान होतील.
२४ एप्रिल (गुरुवार) रोजी ग्रामस्थ आणि भक्तांकडून ओटी भरण्याचा कार्यक्रम होईल. यावेळी मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित असतील. २५ एप्रिल (शुक्रवार) रोजी सकाळी ८ वाजता श्री दुर्गादेवी आणि श्री मसणाई देवी यांच्या ओटी भरण्याचा कार्यक्रम होईल. सायंकाळी ४ वाजता बेळगाव जिल्हा पालकमंत्री सतीश जारकीहोळी यांच्या उपस्थितीत विशेष समारंभ होईल.
२६ ते २९ एप्रिल दरम्यान ओटी भरणे, नाटक, भजन, मनोरंजन कार्यक्रम आणि विविध सांस्कृतिक उपक्रम आयोजित केले जातील. ३० एप्रिल (बुधवार) रोजी सायंकाळी ५ वाजता श्री महालक्ष्मी देवीच्या सिमोल्लंघनाने यात्रोत्सवाचा समारोप होईल.
या यात्रोत्सवादरम्यान माजी मंत्री रमेश जारकीहोळी, राज्यसभा सदस्य इराण्णा कडाडी, माजी विधानपरिषद सदस्य विवेकराव पाटील, बेळगाव दक्षिण आमदार अभय पाटील, युवा नेते मृणाल हेब्बाळकर, जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन, पोलीस आयुक्त याडा मार्टिन मार्बन्यांग यांसारख्या अनेक गणमान्य व्यक्तींचा सत्कार करण्यात येईल.
पत्रकार परिषदेत यात्रा समितीचे सदस्य आणि गावातील प्रमुख नागरिक उपस्थित होते.