हंचिनाळ येथे आयोजित करण्यात आलेल्या बैलगाडी,घोडा बैलगाडी आणि घोड्याच्या शर्यतीत महाराष्ट्र आणि कर्नाटकतील बैलजोड्या, घोडे सहभागी झाले होते. या शर्यती पाहण्यासाठी हजारो शौकीनानी गर्दी केली होती.हंचिनाळ येथील माळावर घेण्यात आलेल्या शर्यती डोळ्यांचे पारणे फेडणाऱ्या ठरल्या.बैलगाडी शर्यत आणि अन्य शर्यती अत्यंत चुरशीच्या ठरल्या. शर्यत पाहण्यासाठी आलेले अनेक शौकीन बैलगाडीच्या बरोबरीने आपले दुचाकी वाहन पळवण्याचा प्रयत्न करत होते.
घोडा बैलगाडी शर्यत देखील उपस्थितांचे आकर्षण ठरली. घोडा शर्यतीत घोडेस्वारांनी देखील घोडा वेगाने पळवून आपले कौशल्य दाखवले.बैलगाडी शर्यतीत दानोळी येथील बंडा खिलारे यांच्या बैलगाडीने प्रथम क्रमांक पटकवला.दानवाडच्या कुणाल पाटील यांच्या बैलगाडीने द्वितीय तर राधानगरीच्या स्वराज साळोखे यांच्या बैलगाडीने तृतीय क्रमांक मिळवला. विजेत्यांना रोख रक्कम आणि ट्रॉफी देऊन गौरवण्यात आले.