बसवन कुडची येथील इंगळ्यांची यात्रा भक्तिमय वातावरणात
बसवन कुडची येथील श्री बसवण्णा, श्री कलमेश्वर, श्री ब्रह्मदेव यात्रेनिमित्त इंगळ्यांचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी शेकडो भाविकांनी निखाऱ्यावरून पळण्याच्या अर्थात इंगळ्याच्या कार्यक्रमात सहभाग नोंदवला.
बसवन कुडची येथील यात्रा ही इंगळ्याची यात्रा म्हणूनच ओळखली जाते. इंगळ्याचा कार्यक्रम पाहण्यासाठी पंचक्रोशीतील हजारो भाविकांनी गर्दी केली होती.
मंदिरातील धार्मिक विधी झाल्यावर इंगळ्याची पूजा करण्यात आली. त्यानंतर इंगळ्याच्या कार्यक्रमाला प्रारंभ झाला. हर हर महादेवाचा जयघोष करत भाविक इंगळ्यातून धावत होते. इंगळ्याच्या कार्यक्रमात अग्रभागी मानकरी होते. भक्तांच्या गर्दीने मंदिराचा परिसर फुलून गेला होता. यात्रेनिमित्त कर्नाटक आणि महाराष्ट्रातून मोठ्या संख्येने भाविक आले आहेत. यात्रेनिमित्त कुस्त्या आणि अन्य कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.