बेळगावच्या चव्हाट गल्लीमध्ये न झालेल्या रस्त्याचा वाढदिवस केक कापून आणि बोंब मारून करण्यात आला. गेल्या तीन वर्षांपासून रस्त्याचे काम झाले नसल्याबद्दल अनोख्या पद्धतीने निषेध व्यक्त करून महिलांनी सगळ्यांचे लक्ष वेधून घेतले.
गेल्या तीन वर्षांपासून रस्ता खोदकामानंतर तसाच सोडून दिल्यामुळे संतप्त नागरिकांनी होळीच्या दिवशी ‘रस्त्याचा वाढदिवस’ साजरा करत केक कापला आणि जोरजोरात ‘बोंब’ मारत प्रशासनाविरोधात रोष व्यक्त केला.
चव्हाट गल्लीतील नागरिकांनी केलेला शंखनाद प्रशासनाच्या कानावर पडावा आणि येथील रस्त्याची समस्या सोडवण्यासाठी प्रशासनाने त्वरित पावले उचलावीत यासाठीच होती.
बेळगावमधील चव्हाट गल्लीतील नागरिक गेल्या तीन वर्षांपासून रस्त्याच्या दुरुस्तीच्या प्रतीक्षेत आहेत. रस्त्याचे खोदकाम झाल्यानंतर त्याकडे पूर्णपणे दुर्लक्ष करण्यात आले. त्यामुळे नागरिकांना खड्डे, चिखल आणि धुळीतूनच प्रवास करावा लागत आहे.