संजीवीनी वृद्धांना आधार मासिक रेशन सपोर्ट योजना सलग दोन वर्षानंतरही सुरूच..
बेळगाव:
संजीवीनी वृद्धांना आधार या संकल्पनेतून दरमहा गरीब गरजू वृद्धांना देण्यात येणाऱ्या रेशन किट वितरणाला दोन वर्षे पूर्ण झाली असून प्रत्येक महिन्याच्या पंधरा तारखेच्या अगोदर गरजू लाभार्थींच्या घरपोच ही सेवा उपलब्ध करून दिली असल्याचे चेअरमन मदन बामणे यांनी सांगितले.
समाजासाठी काहीतरी करावं अशी अनेकांची इच्छा आले पण त्यातील काहीजण मात्र मदतीसाठी पुढे येत असतात, कालांतराने तेही थांबतात पण आम्ही ही सेवा कायमस्वरूपी चालू ठेवण्याचा निर्धार केला आहे.
संजीवीनी वृद्धांना आधार या उपक्रमासाठी सध्या काही मोजकेच लोक मदत करीत आहेत उर्वरित सारा भार फौंडेशन उचलत आहे भविष्यात जर का मदतीचे हात पुढे आले तर अजूनही गरजूंपर्यंत आम्ही पोहोचू असेही त्यांनी सांगितले.
आदर्शनगर येथील संजीवीनी फौंडेशनमध्ये हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक व उपस्थितांचे स्वागत करताना प्रकल्प प्रमुख पद्मा औशेकर यांनी २६ जानेवारी २०२३ रोजी सुरू केलेली संजीवीनी वृद्धांना आधार ही सेवा अविरतपणे सुरू असून सुरुवातीला बेळगाव शहरातील जवळपास चाळीसहून अधिक अर्ज आले होते त्यामधील बारा जणांना ही मदत देण्यात येत होती यातील तीन महिला मयत झाल्याने सध्या नऊ वृद्ध महिला याचा लाभ घेत आहेत असे सांगितले.
दर महिन्याला घरपोच रेशन किट पुरवले जाते आणि वर्षातून एकदा त्यांना फौंडेशनमध्ये बोलवून किट प्रदान करण्यात येतात असेही त्यांनी सांगितले.
यानंतर संस्थेचे चेअरमन मदन बामणे, मुख्य समुपदेशक सरिता सिद्दी,पद्मा औशेकर समुपदेशक सावित्री माळी, अर्चना शीरहट्टी, प्रसाद वालीकर,एच आर प्रमुख कावेरी लमाणी यांच्याहस्ते रेशन किटचे वाटप करण्यात आले.
यानंतर वृद्ध लाभार्थ्यांनी आपले मनोगत व्यक्त करताना एका व्यक्तीला महिनाभर पुरेल इतके तेल साखर चहा पावडर,डाळी तिखट मीठ साबण असे वीसहुन अधिक प्रकारचे सारे साहित्य आम्हाला दर महिन्याला घरपोच दिले जाते त्याबद्दल संस्थेप्रती कृतज्ञता व्यक्त केली.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मिथाली कुकडोळकर यांनी तर आभार विजयालक्ष्मी पाटील यांनी मानले.