गेल्या काही दिवसापासून बंद असलेली कर्नाटक आणि महाराष्ट्र बससेवा गुरुवारी दुपार पासून पूर्ववत सुरु करण्यात येणार असल्याची माहिती बेळगावचे जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांनी दिली आहे. तोपर्यत कर्नाटकच्या बसमधून महाराष्ट्र सीमेपर्यंत प्रवास करता येईल तर महाराष्ट्राच्या बसमधून कर्नाटक सीमेपर्यंत प्रवास करता येईल. नंतर त्यांना त्यांच्या इच्छित स्थळी प्रवास करता येईल.
बस सेवा सुरु करण्याबाबत आणि सुरक्षा पुरवण्या बाबत कर्नाटकाच्या मुख्य सचिवानी महाराष्ट्राच्या मुख्य सचिवांशी चर्चा केली आहे. कर्नाटकच्या पोलीस महासंचालकांनी महाराष्ट्राच्या पोलीस महासंचालकांशी सुरक्षेच्या विषयावर चर्चा केली आहे. बेळगाव आणि कोल्हापूर जिल्हाधिकाऱ्यांनी देखील गुरुवारी दुपारी पासून बस सेवा सुरु करण्यासाठी आवश्यक ती तयारी आणि उपाय योजना केली आहे. दोन्ही राज्यांचे पोलीस आणि अन्य अधिकारी एकमेकांशी समन्वय साधून असल्याची माहिती देखील जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांनी दिली.