गेल्या काही दिवसापासून महाराष्ट्र आणि कर्नाटक सीमेवर फिरत असलेल्या हत्तीचे राकसकोप जलाशयाच्या परिसरात रविवारी दर्शन झाले. हत्ती रस्त्यावरून आरामात फिरत चालल्याचे अनेकांनी पाहिले.राकसकोप जलाशयाच्या परिसरात उसाची शेती असल्याने हत्तीने त्या परिसरात मुक्काम ठोकला आहे. उसावर ताव मारून त्या परिसरातच हत्ती फिरत असल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले.
उसावर ताव मारून झाल्यावर हत्ती रस्त्यावरून निघाला होता. यावेळी दुचाकीवरून दोघे जण जात होते. दुचाकीचा आवाज ऐकून हत्ती वळून दुचाकी स्वाराकडे धावत निघाला. हे पाहून प्रसंगावधान राखून दुचाकी स्वारांनी दुचाकी वळवून धूम ठोकली. वन खात्याने हत्तीला जंगलात पाठवण्याची व्यवस्था करावी अशी शेतकऱ्यांनी मागणी केली आहे.