मराठीत बोललो नाही म्हणून वीस हून अधिक जणांनी बस थांबवून मारहाण केल्याचा आरोप बस कंडक्टरने केला असून या प्रकरणी पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली आहे. बसमधून एक तरुण आणि तरुणी मध्यवर्ती बस स्थानकातून बाळेकुंद्री खुर्द येथे निघाले होते. यावेळी तरुणीने दोघांचे तिकीट मागितले. यावेळी दुसरा प्रवासी कोण म्हणून कंडक्टरने विचारले असता तरुणीने तरुणाकडे बोट दाखवले.
यावेळी कन्नड मधून बोलणाऱ्या कंडक्टरला मराठीत बोला असे तरुणाने सांगितले असता मला मराठी येत नाही, मी कन्नड मधेच बोलणार असे उत्तर दिले. नंतर तरुणाने तुला आमचे गाव येऊदे मग सांगतो असे उत्तर दिले. बस बाळेकुंद्री खुर्द येथे येताच पन्नास हून अधिक लोकांनी बस रस्त्यात अडवली. नंतर बसमध्ये वीस हून अधिक जणांनी चढून कंडक्टरला मारहाण केली.यावेळी मध्यस्थी करण्यास आलेल्या बस ड्रायव्हरला देखील शिवीगाळ करून मारहाण करण्यात आल्याचा आरोप करण्यात आला आहे.
नंतर कंडक्टरने जिल्हा रुग्णालयात जावून उपचार करवून घेऊन माळमारुती पोलीस स्थानकात तक्रार दाखल केली आहे. याच बसमधून प्रवास करणाऱ्या एका प्रवाशाने मराठी भाषिकाना जाणून बुजून टार्गेट केले जात असल्याचा आरोप केला आहे.