बेळगाव:एकाहून एक प्रस्तुत सदाबहार, हृदयस्पर्शी, सुश्राव्य, सुमधूर, सुरेल भावगीते, सोबतीला वाद्यांची अप्रतिम साथसंगत, ध्वनिसंयोजन आणि वेळोवेळी मनस्वी उस्फूर्त दाद देणारे रसिक श्रोते यामुळे रविवारची रम्य संध्याकाळ स्वरांजलीच्या संगीताने न्हाऊन गेली. निमित्त होते श्री सरस्वती वाचनालयाच्या 150 व्या शतकोत्तर सुवर्णमहोत्सवी वर्षानिमित्त वाचनालयाच्या संगीत कला मंच आयोजित गायक विनायक मोरे व गायिका अक्षता मोरे यांच्या “स्वरांजली” संगीत मैफलीचे.
प्रारंभी वाचनालयाच्या अध्यक्षा स्वरूपा इनामदार यांनी स्वागत, प्रास्ताविक आणि कलाकारांची ओळख करून दिली. कार्याध्यक्ष सुहास सांगलीकर यांच्या हस्ते विनायक मोरे व अक्षता मोरे यांना शाल, स्मृतिचिन्ह व पुष्पगुच्छ देऊन सन्मानित करण्यात आले. मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले. त्यानंतर तब्बल दोन तास रंगलेल्या संगीत मैफलीत विनायक मोरे व अक्षता मोरे यांनी अनेक बहारदार भावगीते अप्रतिमपणे प्रस्तुत करुन उपस्थितांना मंत्रमुग्ध केले. त्यांना सिंथेसायझर सुनील गुरव (कोल्हापूर), तबल्यावर संतोष पुरी व आॅक्टोपॅडवर स्नेहल जाधव यांनी उत्कृष्ट साथसंगत करून कार्यक्रमात रंगत आणली.
कार्यक्रमात या जन्मावर या जगण्यावर, शतदा प्रेम करावे, चांदणे शिंपित जाशी, लाजून हासणे अन् हासून ते पहाणे, धुंदी कळ्यांना धुंदी फुलांना, हे चांदणे फुलांनी शिंपित रात्र आली, तुला पाहिले मी नदीच्या किनारी, फुलले क्षण माझे फुलले रे, फिटे अंधाराचे जाळे, धुंदीत गाऊ मस्तीत राहू, गारवा वाऱ्यावर भिरभरभिर पारवा, शारद सुंदर चंदेरी राती, संधिकाली या अशा, वाट इथे स्वप्नातील संपली जणू, चंद्र आहे साक्षीला या गीतांचे तन्मयतेने सादरीकरण करण्यात आले. ने मजसी ने परत मातृभूमीला, सागरा प्राण तळमळला गीताने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली. कार्यक्रमास बहुसंख्य रसिकश्रोते, निमंत्रित उपस्थित होते.