बेळगांव:दारू पिऊन सातत्याने त्रास देणाऱ्या पतीचा पत्नीने ओढणीने गळा आवळून खून केला. शुक्रवारी मध्यरात्री साडेबाराच्या सुमारास घडलेली ही घटना शनिवारी दुपारी साडेबाराच्या सुमारास रामतीर्थनगर येथे उघडकीस आली.
अमित निजाप्पा रायबाग (वय ३४, मूळचे राहणार. कब्बूर, ता. चिकोडी, सध्या रा. रामतीर्थनगर) असे मृताचे नाव आहे. याप्रकरणी संशयित पत्नी आशा अमित रायबाग (वय २९, मूळ राहणार. हिडकल, तालुका. रायबाग) हिला माळमारुती पोलिसांनी अटक केली.
याबाबतची माहिती अशी की, अमित व आशा हे मूळचे चिकोडी तालुक्यातील कब्बूर येथील असून ते येथे कामानिमित्त आले होते. या दाम्पत्याला ९ वर्षाचा मुलगा व ७ वर्षाची मुलगी आहे. पती अमित हा टीव्ही दुरुस्तीचे काम करत होता. त्याला दारूचे व्यसन असल्याने रोज दारू पिऊन पत्नी आशासोबत भांडण काढत असे. शुक्रवारी रात्रीदेखील तो भरपूर दारू पिऊन आला.
रात्री बाराच्या सुमारास पती-पत्नीमध्ये जोराचे भांडण सुरू झाले. यावेळी पतीने मारबडव सुरू केल्याने भांडण वाढले. रागाच्या भरात पत्नीने जवळच पडलेली ओढणी घेऊन पतीचा गळा आवळला. आधीच मद्याच्या आधीन असलेल्या पतीला फारशी हालचाल करता आला नाही. त्यामुळे गळ्याभोवती ओढणी करकचून आवळल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला.