बेळगाव :प्रयागराज येथे सुरू असलेल्या महा कुंभमेळ्यासाठी जाणाऱ्या बेळगावातील चार जणांसह शुक्रवारी सकाळी मध्य प्रदेशातील इंदूरजवळ झालेल्या रस्ते अपघातात मृत्यू झाला आहे. या दुर्दैवी घटनेमुळे पुन्हा एकदा बेळगाव शहर हळहळले आहे. कुंभमेळ्यातील चेंगराचेंगरीच्या घटनेत चार जणांचा मृत्यू झाला . तर एका भाविकाचा हृदयविकाराने मृत्यू झाला आहे. त्यात आता पुन्हा या दुर्दैवी अपघाताने चार बळी घेतल्यामुळे अवघ्या शहरावर शोककळा पसरली आहे. सदर अपघातात मृत्युमुखी पडलेले चौघेजण गणेशपुर येथील रहिवासी असल्याचे बोलले जात आहे. याच अपघातात इंदूर येथील स्थानिक असणाऱ्या आणखी दोघांचा मृत्यू झाल्याचे वृत्त आहे. बेळगावातून एक मिनी बस करून उज्जैन सह प्रयागराज येथे हे भाविक प्रवासाला निघाले होते.
अपघातात बळी गेलेल्या दोघांची नावे सागर आणि नीता अशी असल्याचे समजते. तर उर्वरित चार जणांची नावे अद्याप निश्चित झालेली नाहीत.
बेळगावहून महाकुंभ मेळ्यासाठी निघालेल्या १९ जणांच्या गटातील चार जणांचा मृत्यू झाला आहे. इंदूरचे भाजप जिल्हाध्यक्ष मिश्रा जखमींची काळजी घेत आहेत. त्यांनी बेळगावचे खासदार जगदीश शेट्टर यांच्याशी आधीच संपर्क साधून माहिती दिल्याचे कळते.