उद्यापासून अनगोळ येथे विश्वकर्मा महोत्सव
बेळगांव:श्री विश्वकर्मा मनुमय पांचाळ संघ, अनगोळतर्फे यंदा ३१ वा ‘श्री विश्वकर्मा महोत्सव’ साजरा करण्यात येणार आहे. यानिमित्त रविवारी (ता. ९) व सोमवारी (ता. १०) विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. रविवारी महिला व शालेय मुला-मुलींसाठी विविध स्पर्धा घेण्यात येणार आहेत.
सकाळी ११ ते दुपारी १ या वेळेत महिलांसाठी रांगोळी स्पर्धा व मुला-मुलींसाठी चित्रकला स्पर्धा होणार आहे. सायंकाळी ५ ते ६ या वेळेत शालेय मुला-मुलींसाठी व महिलांकरिता लिंबू चमचा, संगीत खुर्ची स्पर्धा होणार आहे. सायंकाळी ७ ते रात्री ९ या वेळेत नृत्य, तसेच गायन स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. सोमवारी सकाळी ८-३० वा. प्रकाश सावंत सुतार यांच्या हस्ते ध्वजारोहण होणार आहे. ९ वा. श्री विश्वकर्मा मूर्तीवर महाअभिषेक, १० वा. तीर्थप्रसाद १२.३० पर्यंत श्री विश्वकर्मा उत्सव पाळणा, तर दुपारी १ पासून महाप्रसादाचे वाटप होणार आहे. याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून दक्षिणचे आमदार अभय पाटील यांच्यासह जितेंद्र गुंडप्पण्णवर, माजी नगरसेवक विनायक गुंजटकर आदी उपस्थित राहणार आहेत.
सायंकाळी ४ ते ५ गुरुदत्त सेवा भजनी मंडळ यांचा भजन कार्यक्रम, ५ ते ६ महिलांसाठी हळदी-कुंकू समारंभ होणार असून, याप्रसंगी प्रमुख पाहुण्या म्हणून माजी महापौर शोभा सोमणाचे, मीना बेनके, अर्चना मेस्त्री (कम्मार), सुवर्णा पाटील, आदी उपस्थित राहणार आहेत. सायंकाळी ६ वाजता मान्यवरांच्या हस्ते बक्षीस वितरण कार्यक्रम होणार असून रात्री ८ ते ९ या वेळेत माऊली भजनी मंडळाचा भजन कार्यक्रम, तर ९ ते १० या वेळेत श्रीराम भजनी मंडळ अनगोळ यांचा भजन कार्यक्रम होणार आहे. समाज बांधवांनी कार्यक्रमास उपस्थित राहावे, असे संघातर्फे कळविण्यात आले आहे.