This is the title of the web page
This is the title of the web page

Live Stream

April 2025
S M T W T F S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
27282930  

| Latest Version 9.4.1 |

State

*तालुका आदर्श शिक्षक पुरस्कार विजेते श्री. राजाराम लक्ष्मण पाटील यांच्या कार्याचा आढावा*

*तालुका आदर्श शिक्षक पुरस्कार विजेते श्री. राजाराम लक्ष्मण पाटील यांच्या कार्याचा आढावा*
D Media 24

*चन्नेवाडी तालुका खानापूर येथील व तालुका आदर्श शिक्षक पुरस्कार विजेते श्री. राजाराम लक्ष्मण पाटील यांचे दिनांक 19 जानेवारी 2025 रोजी दुःखद निधन झाले, आज त्यांचा बारावा दिवस त्यानिमित्त त्यांच्या कार्याचा घेतलेला आढावा*

श्री राजाराम लक्ष्मण पाटील उर्फ रा.ल. गुरुजी यांचा जन्म खानापूर तालुक्यातील चन्नेवाडी या गावी दिनांक 4 मार्च 1929 रोजी एका शेतकरी कुटुंबात झाला,त्यांचे प्राथमिक शिक्षण चन्नेवाडी येथे तर पाचवी ते सातवी पर्यंतचे शिक्षण नंदगड येथे झाले,पुढील शिक्षण घेण्याची त्यांची खूप इच्छा होती परंतु आईच्या अकाली निधना नंतर घरची जबाबदारी त्यांच्यावर पडल्यामुळे त्यांच्या पुढील शिक्षणात खंड पडला, सातवी परीक्षा पास झाल्यानंतर 13 जुलै 1956 रोजी प्राथमिक शिक्षक म्हणून अवघ्या 18 व्या वर्षी खानापूर तालुक्यातील कोणकीकोप येथे रुजू झाले, इ.स.1962 ते 1964 या काळामध्ये मराठी ट्रेनिंग कॉलेज वडगाव येथे ट्रेनिंग कोर्स घेत असताना एस.एस.सी.परीक्षा पास झाले व 1964 साली टी. सी. एच. कोर्स पूर्ण केला, याच कोर्स दरम्यान त्यांची शिकवण्याची उत्कृष्ट कार्यशैली व पद्धत पाहून त्यावेळचे गोव्याचे मुख्यमंत्री कै. दयानंद बांदोडकर यांच्या हस्ते कॉलेजमधील एक आदर्श शिक्षक म्हणून पुरस्कार देऊन त्यांना सन्मानित करण्यात आले,त्यानंतर खानापूर तालुक्यातील किरहलशी येथे अडीच वर्षे, हालगा येथे पंधरा वर्षे व हालशी मॉडेल मराठी मुलांची शाळा येथे तब्बल 21 वर्षे नोकरी केली, 1996 साली प्रशासनाचा खानापूर तालुक्याचा आदर्श शिक्षक पुरस्कार म्हणून त्यांना जाहीर करण्यात आला, त्याचबरोबर त्यावेळचे तत्कालीन आमदार कै.अशोक नारायण पाटील यांच्यातर्फे त्यांचा सत्कार करण्यात आला होता, 41 वर्षांच्या प्रदीर्घ शिक्षकी सेवेनंतर ते 31 मार्च 1997 रोजी हलशी येथून मुख्याध्यापक या पदावरून निवृत्त झाले.

रा.ल. पाटील गुरुजी यांनी आपल्या प्रेमळ तसेच मृदू भाषेतून आपला शिक्षकी पेशा सांभाळत असताना खानापूरचे तरुण शिस्तप्रयोग श्री. पोमय्या साहेब यांनी श्री.रा.ल.पाटील यांच्या हलगा शाळेची वार्षिक तपासणी करून शाळेला प्रथम क्रमांक देऊन गौरव केला होता, शाळेचे रेकॉर्ड उत्कृष्ट ठेवल्याबद्दल शाळेला प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले. शाळेचे कोणतेही कामकाज असू देत ते नीटनेटके ठेवून त्यांची उत्तमरित्या जपणूक करण्यात रा.ल. पाटील गुरुजी यांचा हातखंडा होता, ते एक शिस्तप्रिय शांत स्वभाव प्रामाणिक कर्तव्यदक्ष विद्यार्थीप्रिय पालकप्रिय व मुलांना न मारता शिकवणारे प्रेमळ शिक्षक म्हणून परिचित होते, गणित हा त्यांचा आवडता विषय होता गणितातील बीजगणित व अंकगणित सोडविताना अगदी सहजरीत्या व सोप्या पद्दतीने ते विद्यार्थ्यांना शिकवीत, जरी त्यांची शाळा सातवीपर्यंत असली तरी आठवी ते दहावीपर्यंतचे विद्यार्थी सुद्धा त्यांच्याकडे बीजगणित सोडविण्यासाठी येत असत आणि ते सहजरीत्या त्यांना शिकवून ते मार्गदर्शन करत असत, शाळेच्या विद्यार्थ्यांमध्ये सांस्कृतिक कार्यक्रमाची आवड निर्माण व्हावी म्हणून त्यांनी गीत रामायणाची सुरुवात केली हा गीत रामायणाचा कार्यक्रम इतका प्रसिद्ध झाला की खानापूर तालुक्यात विविध ठिकाणी हा गीत रामायणाचा कार्यक्रम साजरा होऊ लागला व इतर सांस्कृतिक कार्यक्रमात तो सादर करून दाखवण्यात येत होता, तसेच हलशी येथील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या समोर रा.ल. पाटील तयार केलेले सांस्कृतिक कार्यक्रम तसेच गीत रामायण सादर होणे हे नित्याचेच होऊ लागले होते.

रा.ल. पाटील गुरुजी जरी सरकारी नोकरीत राहिले असली तरी महाराष्ट्र एकीकरण समितीचे ते सक्रिय कार्यकर्ते होते, मराठी भाषा व संस्कृती टिकावी म्हणून आपल्या भागात ते सतत प्रयत्नशील असत, ग्रामपंचायत पासून लोकसभेपर्यंत कुठलीही निवडणूक असो ते प्रत्येकाच्या घरी जाऊन आपल्या परीने महाराष्ट्र एकीकरण समितीच्या उमेदवारास जास्तीत जास्त मतदान कसे होईल यासाठी ते प्रयत्न करत असत,चन्नेवाडी मराठी प्राथमिक शाळेची इमारत ही रा.ल.पाटील गुरुजी यांचे वडील कै. लक्ष्मण पाटील यांनी दान म्हणून दिलेली आहे आणि त्याच जागेवर ही इमारत उभी असून दहा वर्षांपूर्वी शाळा बंद होण्याच्या मार्गावर होती त्यावेळेला पाटील गुरुजी यांनी घरोघरी जाऊन शाळेला विद्यार्थी पाठविण्याची पालकांना प्रवृत्त केले व पुढे आणखी दोन वर्षे चालू राहिली, त्या प्रयत्नानंतरही शाळा आठ वर्षे बंद होती त्यासाठी ती पुन्हा सुरू व्हावी म्हणून त्यांनी गावातील युवकांना मार्गदर्शन केले व ग्रामस्थ व पालकांच्या प्रयत्नातून शाळा जून 2024 मध्ये पुन्हा सुरू झाली, रा.ल. पाटील गुरुजी यांनी गावच्या सामाजिक कार्यात भाग घेत असताना विविध कार्यक्रम राबविले, त्यापैकी एक म्हणजे 1970 च्या दरम्यान गावातील आपल्या सवंगड्या समवेत आराध्य दैवत श्री छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती उत्सव सुरू केला, 1980 नंतर सलग पाच वर्षे ते त्या शिवजयंती उत्सव मंडळाचे अध्यक्ष होते माजी आमदार कै. निळकंठराव सरदेसाई तसेच कै.बळवंतराव सायनाक यांनीही त्यावेळेला निमंत्रित केले गेले होते व त्यांनी उपस्थिती दर्शविली होती,या शिवजयंती उत्सव मंडळाचा उत्तम दर्जाचा पायंडा त्यांनी घालून दिला व त्याच मार्गदर्शनावर शिवजयंती अनेक वर्षे साजरी केली गेली, पुढे काही अपरिहार्य कारणास्तव हा उत्सव बंद झाला, याची सल रा.ल. गुरुजींना कायम असायची. तसेच दसरा सणात शिवलिंग या कार्यक्रमाला शेतकरी बांधव आपल्या बैलजोड्या सजून गावातील मंदिरांना पूजत असत हा कार्यक्रम ही त्यांनी आपल्या मार्गदर्शनावरती कित्येक वर्ष चालू ठेवला होता, व त्या कार्यक्रमाचा हिशोब व रेकॉर्ड हे नीटनेटके ठेवून त्यांनी एक आदर्श घालून दिला होता, आपलं चन्नेवाडी गाव शांत व सलोख्याच्या वातावरणात राहावं यासाठी ते विविध भांडण तंट्यामध्ये सलोख्यासाठी मध्यस्थी करायचे, याच माध्यमातून चन्नेवाडी गावाला इ. स. 2012-13 ला खानापूर तालुका वकील संघटनेचा तंटामुक्त गाव पुरस्कार त्यांच्याच अध्यक्षतेखाली प्रदान करण्यात आला होता.

कौटुंबिक व आपल्या नातेवाईकांमध्ये नेहमी सलोख्याचे वातावरण रहावे यासाठी ते सतत प्रयत्नशील असत आपल्या कुटुंबातील किंवा नातेवाईकांमधील व्यक्ती उच्चशक्ती शिक्षित व्हावी, यासाठी ते मार्गदर्शन करत असत. आज त्यांचे संपूर्ण कुटुंब सुशिक्षित तसेच स्वतंत्र विचाराचे असून नातवंडानेही त्यांचा नावलौकिक करावा असा त्यांचा मानस होता,म्हणूनच आज त्यांनी त्यांची नातवंडे ही चांगल्या प्रकारचे शिक्षण घेत आहेत,आपल्या शिक्षकी पेशाला अनुसरून त्यांचे दोन चिरंजीव फोंडूराव व किरण हे शिक्षकी पेशात आहेत तर मराठी भाषेवर निस्सीम प्रेम असणारे रा.ल. पाटील गुरुजी यांचे कनिष्ठ चिरंजीव धनंजय पाटील हे मराठी भाषा व संस्कृती टिकावी यासाठी कार्यरत आहेत, त्यांच्या सर्व सुना उच्चशिक्षित असून दोघी गृहिणी तर दोघी आपापल्या क्षेत्रात नोकरी व्यवसाय सांभाळत आहेत,एक कुटुंबवत्सल,शिक्षणप्रेमी, समाजप्रेमी, मार्गदर्शक रा.ल. पाटील गुरुजी नावाचा अवलिया वयाच्या 86 यावर्षी दिनांक 19 जानेवारी 2025 रोजी अनंतात विलीन झाला, या 86 वर्षातील 40 वर्षे साखरीन (डायबेटीस) या आजाराशी झुंजत आपले परिपूर्ण व यशस्वी जीवन त्यांनी व्यतीत केले,अशा या अवलियाच्या जाण्याने गाव असू दे किंवा पंचक्रोशी यामध्ये एक पोकळी निर्माण झाली आहे, ती पुन्हा भरून निघणे फार अवघड आहे, अशा या अवलियाला चिरशांती लाभावी अशी दयाघन परमेश्वराकडे प्रार्थना…!

—– *पाटील कुटुंबीय व ग्रामस्थ* चन्नेवाडी ता.खानापूर


Independent Journalism Can’t Be Independent Without Your Support, Contribute By Clicking Below.