भारत विकास परिषदेच्यावतीने राष्ट्रीय बालिका दिन शुक्रवारी बालिका आदर्श कन्या विद्यालयात उत्साहात साजरा करण्यात आला. प्रमुख अतिथी म्हणून आयुर्वेदिक तज्ञ डॉ. ऋचा नाईक आणि किर्ती चिंचणीकर उपस्थित होत्या.
प्रारंभी अक्षता मोरे यांनी संपूर्ण वंदे मातरम् प्रस्तुत केले. मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून भारतमाता आणि स्वामी विवेकानंद यांच्या प्रतिमांचे पूजन करण्यात आले. परिषदेचे अध्यक्ष विनायक मोरे स्वागत व प्रास्ताविक भाषण केले. सुखद देशपांडे यांनी अतिथिंचा परिचय करून दिला. प्रांत अध्यक्ष स्वाती घोडेकर यांनी राष्ट्रीय बालिका दिन आयोजिण्याचा उद्देश सांगितला. अध्यक्ष विनायक मोरे यांच्या हस्ते अतिथिंना सन्मानीत करण्यात आले.
यावेळी बोलताना डॉ. ऋचा नाईक म्हणाल्या, आरोग्य उत्तम राखण्यासाठी पोषक आहार, व्यायाम आणि योग्यवेळी झोपणे या गोष्टी महत्त्वाच्या आहेत. पोषक आहारामुळे आपल्या शरीरास आवश्यक असलेली ऊर्जा, पोषक घटक आणि द्रव्ये मिळतात. त्यामुळे आपले स्वास्थ्य सुधारते आणि आपले शरीर निरोगी राहण्यास मदत होते. नियमित व्यायाम आणि खेळणेही आवश्यक आहे. खेळांमुळे तणाव कमी होतो, मूड सुधारतो आणि आत्मविश्वास वाढतो. आपले सर्व अवयव सजग राहतात आणि आपले व्यक्तिमत्व सुधारते.
आरोग्य चांगले राखण्यासाठी पुरेशी झोप आणि विश्रांतीही आवश्यक आहे. आजकाल मोबाईलच्या अतिरिक्त वापरामुळे झोप नीट न झाल्याने त्याचा आरोग्यावर विपरीत परिणाम होत आहे. तेव्हा रात्री 10 वा. झोपणे आणि सकाळी 6 वा. उठणे अशी सवय आपण करून घ्यावी. त्यामुळे निश्चितच आपण दिवसभर नेहमी उत्साही आणि ताजेतवाने राहू, असेही त्या म्हणाल्या.
भारत विकास परिषदेतर्फे विद्यार्थिनींना पौष्टिक गुळाचे वितरण करण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विद्या इटी यांनी केले. सचिव के. व्ही. प्रभू यांनी आभार मानले.
कार्यक्रमास भारत विकास परिषदेचे राष्ट्रीय कार्यकारिणी सदस्य पांडुरंग नायक, प्राचार्य व्ही. एन्. जोशी, सुहास गुर्जर, विनायक घोडेकर, सुभाष मिराशी, चंद्रशेखर इटी, डी. वाय. पाटील, जया नायक, सुखद देशपांडे, शुभांगी मिराशी, रजनी गुर्जर, प्रिया पाटील, योगिता हिरेमठ, ज्योती प्रभू आदी उपस्थित होते. बालिका आदर्श विद्यालयाचे मुख्याध्यापक एन्. ओ. डोनकरी तसेच सर्व शिक्षकवृंदाचे सहकार्य लाभले. यावेळी सर्व विद्यार्थिनी उपस्थित होत्या. राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता झाली.