काँग्रेस पक्षाच्या वतीने ‘जय बापू, जय भीम, जय संविधान’ या घोषवाक्याखाली भव्य मेळावा पार पडला.या मेळाव्यात पक्ष कार्यकर्त्यांना संबोधित करताना काँग्रेस पक्षाच्या महासचिव आणि खासदार प्रियांका गांधी यांनी मोदी सरकारवर आणि त्यांच्या धोरणावर सडकून टीका केली.
बेळगावातील सी पी एड मैदानावर आयोजित करण्यात आलेल्या काँग्रेस पक्षाच्या मेळाव्याला काँग्रेस पक्षाध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांच्यासह देशभरातील नेते मंडळी उपस्थित होती.
भाजप आणि संघाचे लोक संविधान विरोधी आहेत.ते आरक्षण कमजोर करू पाहत आहेत. भाजपवाले सामाजिक न्यायाच्या विरूध्द वक्तव्य करतात.न्याय संस्था आणि माहितीचा अधिकार सारखे कायदे ते कमजोर करतात.भाजपने सेबीचा कायदा बदलला ज्यामुळे भ्रष्टाचार वाढला आहे.लोकपाल बिल कमजोर करून निवडणूक आयोगाला शक्तिहीन करून टाकले आहे.भाजपचे सरकार असलेल्या राज्यात महीलांच्यावर अत्याचार करणाऱ्यांना पाठीशी घातले जाते.
कामगार कायद्यात बदल करून भाजपने कामगारांचे हक्क हिरावून घेतले आहेत.शेतकऱ्यांच्या विरोधात भाजपने तीन काळे कायदे आणल्याने शेतकऱ्यांनी आंदोलन केले.या आंदोलनात सातशे हून अधिक शेतकऱ्यांनी प्राण गमावले.निवडणूक आल्यावर भाजपने हे कायदे मागे घेतले अशी टीका प्रियांका गांधी यांनी केली.