कोल्हापूर धरणे आंदोलनासाठी, सर्वपक्षीय नेतेमंडळींना निवेदन
कोल्हापूर – १७ जानेवारी हुतात्मा दिनानिमित्त महाराष्ट्र शासनाला सीमाप्रश्नी जागे करण्यासाठी आणि सीमाप्रश्न चालना मिळविण्यासाठी मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीच्या वतीने कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालय येथे धरणे आंदोलन पुकारण्यात येणार आहे. तरी या धरणे आंदोलनाला कोल्हापुरातील सर्वपक्षीय नेते मंडळींनी सक्रीय सहभाग नोंदवून पाठिंबा द्यावा यासाठी समितीच्या शिष्टमंडळाने विविध नेते मंडळींची भेट घेतली.
तालुका समितीचे कार्याध्यक्ष आर. एम. चौगुले, नगरसेवक रवी साळुंखे, युवा समितीचे सरचिटणीस श्रीकांत कदम, एन.के. कालकुंद्री, निपाणी तालुका म. ए. समिती अध्यक्ष अजित पाटील, कार्याध्यक्ष बंडा पाटील, युवा समितीचे उपाध्यक्ष गुंडू कदम यांनी कोल्हापूरचे खासदार छत्रपती शाहू महाराज, दैनिक पुढारीचे मुख्य संपादक पद्मश्री प्रतापसिंह जाधव, खासदार धैर्यशील माने, कोल्हापूर भाजप ग्रामीण अध्यक्ष नाथाजी पाटील, जिल्हाध्यक्ष राहुल चिकोडे, महानगर अध्यक्ष विजय जाधव, मंत्री हसन मुश्रीफ मनसे शहर प्रमुख दिंडोरले यांच्यासह सर्व पक्षीय नेतेमंडळींना निवेदन देण्यात आली.
यावेळी खासदार शाहू महाराज यांनी धरणे आंदोलनाला पाठिंबा देत सहभागी होणार असल्याचे सांगितले, तसेच दिल्ली येथे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेवून सीमाप्रश्न लवकर सोडवावा अशी मागणी करणार असल्याचे सांगितले. तसेच महाराष्ट्र शासनाची उदासीनता पाहून दुःख व्यक्त केले. खासदार धैर्यशील माने यांनी सुद्धा धरणे आंदोलनात सहभागी होणार असल्याचे कळविले आहे. पद्मश्री डॉ . प्रतापसिंह जाधव जाधव यांनी केंद्रीय पातळीवर प्रयत्न झाले पाहिजे त्यासाठी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेवून चर्चा करू असे आश्वासन दिले. चळवळीतील आपल्या सहभागाच्या आठवणी ताज्या केल्या.
उद्या सर्वपक्षीयांनी म ए समितीच्या धरणे आंदोलनाला पाठिंबा व्यक्त केल्यामुळे सीमाभागातील मराठी भाषिकांना बळ प्राप्त झाले आहे.