बेळगाव:शाकंभरी पौर्णिमेनिमित्त सोमवारी रेणुका भक्तांची श्री रेणुका देवी यल्लमा डोंगरावर मोठी गर्दी झाली होती. सोमवारी शांकभरी पौर्णिमेनिमित्त डोंगरावर श्री रेणुका देवीचा उदो उदो करत पडल्या भरण्याचा कार्यक्रम संपन्न झाला.
रेणुका देवी यात्रेनिमित्त केएसआरटीसी च्यावतीने यात्रा स्पेशल बसेस सोडण्यात आल्या होत्या. सोमवारी बेळगाव ते सौंदत्ती डोंगर अशा 63 यात्रा स्पेशल बसेस सोडण्यात आल्या होत्या. त्याला भाविकांकडून चांगला प्रतिसाद मिळाला.सौंदत्ती यल्लमा रेणुका देवी हे महाराष्ट्राबरोबरच कर्नाटकातील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान आहे. त्यामुळे दरवर्षी शाकंभरी पौर्णिमेनिमित्त यात्रेला लाखोंच्या संख्येने भाविक उपस्थिती दर्शवतात.
सोमवारी देखील मोठ्या संख्येने भाविकांनी डोंगरावर हजेरी लावली होती. अवघा यल्लमा डोंगर भाविकांच्या गर्दीने फुलला होता. यात्रेला भाविकांची वाढती गर्दी लक्षात घेऊन परिवहन महामंडळाकडून दिनांक 19 पर्यंत यात्रा स्पेशल बस सुरू राहणार असल्याची माहिती उपलब्ध झाली आहे. रेणुका देवीच्या पडल्या भरण्याचा कार्यक्रम डोंगरावर संपन्न झाल्यानंतर काही दिवसानंतर प्रत्येक गावचे रेणुका भक्त आपापल्या गावी दाखल होतात.
त्यानंतर प्रत्येक गावामध्ये भक्तिमय वातावरणामध्ये पडल्या भरण्याचा कार्यक्रम संपन्न होतो. यात्रेला भाविकांची मोठ्या प्रमाणावर गर्दी होत असल्यामुळे परिवहन महामंडळाच्या महसुलामध्ये देखील वाढ होत असल्याची माहिती मिळाली आहे. यात्रेनिमित्त डोंगरावर विविध प्रकारची दुकाने आणि स्टॉल्स थाटण्यात आले आहेत. त्याचबरोबर पोलीस प्रशासनाने पोलीस बंदोबस्त तैनात केला आहे.