बेळगावात रौडी शिटर प्रफुल्ल पाटील याच्यावर मध्यरात्री तीन वाजता अज्ञात व्यक्तींनी फायरिंग केल्याची घटना असून फायरींग मध्ये रौडी शिटर सुदैवानेच बचावला आहे.बेळगाव ग्रामीण पोलीस स्थानकाच्या हद्दीत ही घटना घडली आहे. बेळगुंदी गावातून शाहूनगर येथे आपल्या घरी कारमधून प्रफुल्ल पाटील जात असताना अज्ञात व्यक्तीनी त्याच्यावर गोळीबार केला.
कारच्या काचा बंद असल्याने प्रफुल्ल वाचला.गोळीबारामुळे कारच्या खिडकीच्या काचा फुटल्या .फुटलेल्या काचांचे तुकडे प्रफुल्ल याच्या डोक्यात ,चेहऱ्यावर आणि अन्यत्र घुसले आहेत.प्रफुल्ल याच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू असून पोलीस आयुक्त याडा मार्टिन यांनी रुग्णालयाला भेट दिली.पोलीस आयुक्तांनी दिलेल्या माहितीनुसार प्रफुल्ल हा तडीपार होता.
काही दिवसापूर्वी मुदत संपल्यामुळे तो पुन्हा बेळगावात आला होता.नंतर त्याला आणखी एका प्रकरणात अटक झाली होती.त्यातूनही तो जामिनावर बाहेर आला होता. तो रियल इस्टेट उद्योगात असल्याची माहिती मिळाली आहे.त्याच्याकडून माहिती घेतल्यावर नक्की काय घडले हे स्पष्ट होणार आहे.अद्याप गोळीबार प्रकरणी कोणतीही तक्रार झालेली नाही अशी माहिती पोलीस आयुक्तांनी माध्यमांशी बोलताना दिली.