केएलई कॅन्सर हॉस्पिटलचे 30 रोजी लोकार्पण
बेळगाव:
येथील केएलई सोसायटीने स्थापन केलेल्या नव्या कॅन्सर हॉस्पिटलचे लोकार्पण येत्या 30 डिसेंबर रोजी दुपारी चार वाजता राष्ट्रपती द्रोपदी मुर्मु यांच्या हस्ते होणार असल्याची माहिती केएलई संस्थेचे चेअरमन डॉक्टर प्रभाकर कोरे यांनी मंगळवारी पत्रकार परिषदेत दिली.
कार्यक्रमाला विशेष अतिथी म्हणून कर्नाटकाचे राज्यपाल थावरचंद गेहलोत उपस्थित राहणार आहेत. तसेच केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी, कर्नाटकाचे वैद्यकीय शिक्षण आणि कौशल्य विकास मंत्री डॉक्टर शरणप्रकाश पाटील, सार्वजनिक बांधकाम मंत्री सतीश जारकीहोळी, बेळगावचे खासदार जगदीश शेट्टर, उत्तरचे आमदार आसिफ शेठ, दक्षिणचे आमदार अभय पाटील, केएलइ सोसायटी अध्यक्ष प्रभाकर कोरे, कुलगुरू डॉक्टर नितीन गंगणे हे उपस्थित राहणार आहेत.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महांतेश कौजलगी हे राहणार आहेत.पत्रकारांना अधिक माहिती देताना डॉक्टर प्रभाकर कोरे म्हणाले, या हॉस्पिटलला के एल इ डॉक्टर संपतकुमार एस. शिवनगी कॅन्सर हॉस्पिटल, बेळगाव असे नाव देण्यात आले आहे. या कार्यक्रमादरम्यान देणगीदार डॉक्टर संपतकुमार शिवनगी डॉक्टर उदय शिवनगी यांचा सत्कार करण्यात येणार आहे.
केएलइएस कर्करोग रुग्णालय आणि संशोधन केंद्र हे केएलइ अकॅडमी ऑफ हायर एज्युकेशन अँड रिसर्च चा अविभाज्य भाग आहे. हे हॉस्पिटल एकाच छताखाली कर्करोग रुग्णांची योग्य काळजी घेऊन त्यांना उत्तम सेवा देते.
हॉस्पिटल मधील सर्व डॉक्टर कॅन्सर स्पेशालिस्ट आहेत. येथे माफक दरात उपचार केले जातात.
वर्ष 2000 च्या सुरुवातीला उत्तर कर्नाटकातील कर्करोग रुग्णांची वाढती संख्या ओळखून केएलइएस हॉस्पिटलने सक्रिय उपाययोजना सुरू केल्या. मुंबई आणि शिकागो येथील टाटा मेमोरियल सेंटर सारख्या प्रतिष्ठित संस्थांमध्ये वैद्यकीय प्रशिक्षणासाठी कर्मचाऱ्यांना पाठवण्यात आले. 2005 साली हॉस्पिटल ने ऑन्कॉलॉजी सेवा सुरू केली.
वर्ष 2012 मध्ये डॉक्टर प्रभाकर कोरे आणि व्यवस्थापन मंडळाने बेळगाव येथे अत्याधुनिक कॅन्सर हॉस्पिटल उभारण्याचा संकल्प केला. आता हे कॅन्सर हॉस्पिटल 300 बेडचे आणि तीनशे कोटीहून अधिक बजेटमध्ये उभारण्यात आले आहे. 30 डिसेंबर रोजी राष्ट्रपती द्रोपदी मुर्मु यांच्या हस्ते या कॅन्सर हॉस्पिटलचे लोकार्पण होणार असल्याची माहिती डॉक्टर प्रभाकर कोरे यांनी पत्रकार परिषदेत दिली. पत्रकार परिषदेला डॉक्टर एम. व्ही . जाली आणि अन्य डॉक्टर उपस्थित होते.