न्यू इंग्लिश स्कूल सुवर्ण महोत्सवाची तयारी अंतिम टप्प्यात
दक्षिण महाराष्ट्र शिक्षण मंडळ संचलित मुतगे येथील न्यू इंग्लिश स्कूलचा सुवर्ण महोत्सव आणि पदवीपूर्व विद्यालयाचा रौप्य महोत्सव रविवार दि. 29 डिसेंबर रोजी संपन्न होणार आहे. कार्यक्रमाच्या अनुषंगाने अंतिम टप्प्यातील कामांविषयी आढावा बैठक घेण्यात आली. कार्यक्रम पत्रिका वाटप आणि आतापर्यंत झालेल्या देणगी संकलनाची माहिती बैठकीवेळी देण्यात आली. तसेच उर्वरित कामांचे वाटप विविध कमिट्यांना करण्यात आले.
कार्यक्रमासंदर्भात आतापर्यंत झालेली कामे, पूर्वतयारी, देणगी संकलन, कार्यक्रम पत्रिका वाटप, मंडप, भोजन व्यवस्था, सत्कार, आसनव्यवस्था, सुरक्षा व्यवस्था व इतर कामांचे वाटप करण्यात आले. शिक्षक आणि सुवर्ण महोत्सव कमिटीतील सदस्यांचा समावेश असणाऱ्या कमिट्यांना कामाची विभागणी करण्यात आली.
शाळा सुशोभीकरण, विद्युत रोषणाई, मंडप उभारणी व दुरुस्ती कामांची पाहणी करण्यात आली. याप्रसंगी मान्यवरांकडून देणग्याही स्वीकारण्यात आल्या.
बैठकीला सुवर्ण महोत्सव कमिटीचे सदस्य, स्कूल बेटरमेंट कमिटीचे सदस्य, आजी-माजी शिक्षक, पालक, माजी विद्यार्थी व ग्रामस्थ उपस्थित होते.
न्यू इंग्लिश स्कूलचा सुवर्ण महोत्सव व पदवीपूर्व कॉलेजच्या रौप्य महोत्सव कार्यक्रमानिमित्त प्राथमिक, माध्यमिक आणि पदवीपूर्व कॉलेजच्या विद्यार्थ्यांच्या पालकांची सभा घेण्यात आली. यावेळी एन. डी. बंडाचे यांनी 1974 सालापासून आतापर्यंतच्या शाळेच्या वाटचालीची माहिती पालकांना दिली. तर सुवर्ण महोत्सव सोहळा कमिटीचे स्वागताध्यक्ष नारायण कणबरकर यांनी 29 डिसेंबर रोजी होणाऱ्या कार्यक्रमात देणगीदार, शाळेचे माजी शिक्षक व प्रारंभीच्या शाळा सुधारणा कमिटीच्या वारसांचा सत्कार होणार असल्याची माहिती दिली. तसेच पालकांना पाल्यांसह कार्यक्रमाला उपस्थित राहण्याचे निमंत्रण दिले.