आकाशदीप , बुमराह यांनी फॉलोऑन वाचवला
कसोटीची अनिर्णितेच्या दिशेने वाटचाल
ब्रीसबेन:
भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यामध्ये बॉर्डर – गावस्कर मालिकेतील तिसरी कसोटी येथील गाबा स्टेडियमवर खेळवण्यात येत आहे. आघाडीचे फलंदाज ढेपाळल्यानंतर देखील तळाच्या फलंदाजांनी केलेली आक्रमक फलंदाजी यामुळे भारताने फॉलोऑन वाचवला. आकाशदीप आणि जसप्रीत बुमराह आक्रमक आणि दमदार फलंदाजी करून फॉलोऑन वाचविला. चौथ्या दिवसाचा खेळ थांबला तेव्हा भारताने नऊ बाद 252 धावा केल्या होत्या. आकाशदीप दोन चौकार आणि एक षटकारसह नाबाद 27 धावांवर, जसप्रीत बुमराह नाबाद 10 धावांवर खेळत होते.
ऑस्ट्रेलियाने पहिल्या डावामध्ये सर्वबाद 445 धावा केल्या होत्या. यामध्ये स्टीव्ह स्मिथ ने 101 तर ट्रॅव्हीस हेड यांने 152 धावा केल्या होत्या. तसेच ॲलेक्स केरी यांनेदेखील 70 धावांची खेळी केली होती. भारताकडून सर्वात यशस्वी गोलंदाज ठरलेल्या जसप्रीत बुमराह याने सहा विकेट घेतल्या होत्या.
भारताच्या पहिल्या डावाची सुरुवात खराब झाली होती. यशस्वी जयस्वाल फक्त 4 धावा करून तंबूत परतला. त्याचबरोबर भरवशाचे शुभमन गिल , विराट कोहली, ऋषभ पंत, रोहित शर्मा हे देखील विशेष काही करू शकले नाहीत. लोकेश राहुलने दुसऱ्या बाजूने संयमी फलंदाजी करत भारतीय डाव सावरला. लोकेश राहुल आणि कर्णधार रोहित शर्मा यांच्यामध्ये सहाव्या विकेटसाठी महत्त्वपूर्ण 67 धावांची भागीदारी झाली. तसेच सातव्या विकेटसाठी देखील 53 धावांची महत्त्वाची भागीदारी झाली. लोकेश राहुल ला रवींद्र जडेजा ने दुसऱ्या बाजूने चांगली साथ दिली.
रवींद्र जडेजा आणि लोकेश राहुल या दोघांनी खऱ्या अर्थाने भारतीय डाव सावरला. लोकेश राहुलने भारतातर्फे सर्वाधिक 84 धावा तर रवींद्र जडेजा ने 77 धावांची उपयुक्त खेळी केली. भारताला फॉलोऑन वाचवण्यासाठी 33 धावांची गरज असताना रवींद्र जडेजाची विकेट पडली. त्यामुळे भारतावर फॉलोऑनची वेळ येणार असे वाटत होते. अशावेळी तळाच्या फलंदाजांनी म्हणजेच आकाशदीप आणि जसप्रीत बुमराह यांनी नाबाद 39 धावांची भागीदारी केली. त्यामुळेच फॉलोऑन टळला.
खेळाडूंच्या चेहऱ्यावर आनंद
फॉलोऑन टळताच ड्रेसिंग रूम मध्ये बसलेल्या टीम इंडियाच्या
खेळाडूंच्या चेहऱ्यावर आनंद दिसून आला. धावफलकावर भारताच्या 213 धावा लागल्या असताना रवींद्र जडेजा बाद होऊन तंबूत परतला. तेव्हा भारताला फॉलोऑन टाळण्यासाठी 33 धावांची गरज होती. अशावेळी तळाच्या फलंदाजांनी संयमी खेळी करून दाखवली. आकाशदीपने चौकार मारून फॉलोऑन टाळला.
ऑस्ट्रेलियातर्फे कमिन्स सर्वाधिक यशस्वी गोलंदाज ठरला त्याने 4 विकेट घेतल्या. मिचेल स्टार्क यांने तीन विकेट घेतल्या. जोश हेजलवूड आणि लायन यांनी प्रत्येकी एक विकेट घेतली. भारत अजूनही 193 धावांनी पिछाडीवर आहे. बुधवारी खेळाच्या शेवटच्या दिवशी ऑस्ट्रेलिया भारताची शेवटची विकेट लवकर घेऊन सामना जिंकण्याचा प्रयत्न करणार आहे. मात्र तशी शक्यता फारच कमी आहे. सामना अनिर्णित राहण्याची दाट शक्यता आहे. शेवटी क्रिकेट हा अनिश्चिततेचा आणि बे भरवशाचा खेळ असल्याने काहीही होऊ शकते.
एकूणच लोकेश राहुल, रवींद्र जडेजा , आकाशदीप यांच्या आक्रमक आणि संयमी फलंदाजीमुळे टीम इंडियाने या कसोटी सामन्यांमध्ये पुनरागमन केले आहे.