महामेळाव्याला प्रशासनाने परवानगी नाकारली असताना आणि पोलीस खात्याने जमावबंदीचा आदेश लागू केला असतानाही त्याला दाद न देता शेकडो मराठी भाषिक जोरदार घोषणाबाजी करून धर्मवीर संभाजी चौक येथे दाखल झाले आणि महाराष्ट्रात जाण्याची आपली इच्छा पुन्हा एकदा व्यक्त केली.
यावेळी पोलिसांनी दडपशाही करून महामेळावा होणार असलेल्या ठिकाणी गनिमी काव्याने दाखल होत असलेल्या महाराष्ट्र एकीकरण समितीच्या नेते मंडळीना आणि कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले.महाराष्ट्र एकीकरण समितीच्या ऐशी कार्यकर्त्यावर जमाव बंदी आदेश मोडल्याबद्दल गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
महाराष्ट्र एकीकरण समितीने बेळगावात सोमवार पासून सुरू होणाऱ्या कर्नाटक सरकारच्या विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाला विरोध करण्यासाठी धर्मवीर संभाजी चौक येथे सकाळी अकरा वाजता महामेळावा आयोजित केला होता.पण सकाळी साडे दहा वाजताच माजी आमदार मनोहर किणेकर आणि कार्यकर्ते धर्मवीर संभाजी चौक परिसरात वेळेआधीच दाखल झाले.यावेळी जोरदार घोषणाबाजी करून समिती कार्यकर्त्यांनी साऱ्यांचे लक्ष वेधून घेतले.
यावेळी पोलिसांनी तेथे धाव घेऊन ताब्यात घेतले.त्यानंतर काही वेळाने दुसऱ्या बाजूने आणखी एक कार्यकर्त्यांची तुकडी घोषणा देत दाखल झाली.त्या नंतर पुन्हा कार्यकर्त्यांच्या तुकड्या धर्मवीर संभाजी चौकात दाखल झाल्या.यावेळी वेगवेगळ्या दिशेने आणि थोड्या थोड्या वेळाने दाखल होणाऱ्या कार्यकर्त्यांना ताब्यात घेताना पोलिसांची मात्र चांगलीच तारांबळ उडाली.पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या कार्यकर्त्यांना ए पी एम सी पोलीस स्थानकात हलवले त्या नंतर तेथून ते पुन्हा त्यांना मारीहाळ पोलीस स्थानकात हलवले.सायंकाळी सगळ्या कार्यकर्त्यांना मारी हाळ पोलीस स्थानकातून सोडण्यात आले.यावेळी कार्यकर्त्यांनी बेळगाव,कारवार,निपाणी , बीदर, भालकी सह संयुक्त महाराष्ट्र झालाच पाहिजे,बेळगाव आमच्या हक्काचे नाही कोणाच्या बापाचे अशी जोरदार घोषणाबाजी केली.
पोलिसांनी दडपशाही करून महामेळावा होऊ दिला नाही तरी पण महाराष्ट्र एकीकरण समितीच्या कार्यकर्त्यांनी जमाव बंदी आदेशाला न जुमानता आणि अटकेला न घाबरता महामेळावा होणार असलेल्या ठिकाणी दाखल होऊन मराठी अस्मितेचे दर्शन घडवत पुन्हा एकदा महाराष्ट्रात जाण्याची इच्छा व्यक्त केली.पोलीस आयुक्त यडा मार्टिन मारब्यांग यांनी सकाळी धर्मवीर संभाजी चौक येथे भेट देऊन अधिकाऱ्यांना सूचना केल्या.त्यानंतर पोलीस उपायुक्त रोहन जगदीश यांच्या नेतृत्वाखाली महामेळावा ठिकाणी बंदोबस्त ठेवण्यात आला होता.शेकडो पोलीस,अधिकारी बंदोबस्तासाठी तैनात करण्यात आले होते. ड्रोण कॅमेऱ्याने देखील धर्मवीर संभाजी चौकात नजर ठेवण्यात आली होती.पोलिसांनी अनेक ठिकाणी मराठी भाषिकांची वाहने अडवून त्यांना महामेळावा ठिकाणी जाण्यापासून रोखले.