ॲडलेड:
येथे भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात खेळण्यात आलेल्या दुसऱ्या दिवस रात्रीच्या गुलाबी चेंडूवरील कसोटी मध्ये भारताचा लाजीरवाणा पराभव झाला आहे. फक्त आणि फक्त 1031 चेंडूमध्ये ही कसोटी संपली. अवघ्या अडीच दिवसांमध्ये टीम इंडियाचा डाव खल्लास झाला. ऑस्ट्रेलियाने दहा विकेटने भारताचा दणदणीत पराभव करून मालिकेत एक- एक बरोबरी साधली आहे. टीम इंडियाचे कागदी घोडे ऑस्ट्रेलियाने कागदात गुंडाळले असल्याने हा भारताचा लाजिरवाणा पराभव झाला आहे.
ऑस्ट्रेलियाच्या ट्रेव्हीस हेड याला सामनावीर पुरस्कार देण्यात आला . त्याने पहिल्या डावामध्ये 140 धावा केल्या होत्या.
या कसोटी मध्ये भारताने पहिल्या डावामध्ये 180 आणि दुसऱ्या डावामध्ये 175 धावा केल्या होत्या. ऑस्ट्रेलियाने पहिल्या डावात 337 धावा केल्या होत्या. त्यामुळे त्यांना विजयासाठी फक्त 19 धावांची गरज होती. त्यांनी हे आव्हान नाबाद 19 धावा करून पूर्ण केले. या विजयामुळे ऑस्ट्रेलिया टीम डब्ल्यूटीसी च्या पॉइंट टेबल मध्ये पहिल्या क्रमांकावर पोहोचली आहे. या उलट टीम इंडियाची घसरण होऊन ते पहिल्या क्रमांकावरून तिसऱ्या स्थानी घसरले आहेत.
भारताच्या दुसऱ्या डावामध्ये ऑस्ट्रेलियाकडून कमिन्सने सर्वाधिक पाच विकेट घेतल्या. मीचेल स्टार्क याने दोन, स्कॉट बाॅड याने तीन विकेट घेतल्या.
एकटा नितीश रेड्डीच
भारताकडून एकटा नितीश रेड्डीच ऑस्ट्रेलियाला भारी ठरला. त्याने या कसोटीत दोन्ही डावांमध्ये भारताकडून सर्वाधिक प्रत्येकी 42 – 42 धावा केल्या. त्याला दुसऱ्या कोणत्याही फलंदाजाने चांगली साथ दिली नाही . त्यामुळे भारताला हा लाजीरवाणा पराभव स्वीकारा लागला आहे.