शनिवारी बेळगाव जिल्हा कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये रताळ्यांची विक्रमी आवक झाल्याने दरात घसरण झाली. एकाच दिवसात तीन हजार टनाहून अधिक रताळ्यांची आवक झाली.त्यामुळे प्रती क्विंटल आठशे ते बाराशे रू या भावाने विक्री झाली.रताळी आवक मोठ्या प्रमाणावर झाल्यामुळे रताळी दरात घसरण झाल्याचे व्यापारी आणि शेतकऱ्यांनी सांगितले.सध्या भात कापणी आणि मळणीची कामे संपली आहेत.
त्यामुळे शेतकऱ्याला सध्या शेतात दुसरे काही काम नाही.त्यातच फेंगुई चक्री वादळामुळे पावसाचे सावट देखील आहे.त्यामुळे पाऊस झाल्यास शेतात रताळी बाद होऊन जातील म्हणून शेतकऱ्यांनी रताळी काढण्यास गडबड केल्याने रताळी आवक कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये वाढली आणि दरात घसरण झाली.मागच्या आठवड्यात प्रती क्विंटल पंधराशे रू इतका रताळ्याचा दर होता.मागणी कमी आणि पुरवठा जास्त झाल्याने रताळी दर कमी झाला.बेळगाव कृषी उत्पन्न बाजार समितीत बेळगाव तालुका,खानापूर तालुका आणि चंदगड तालुक्यातून रताळ्याची आवक मोठ्या प्रमाणावर झाल्याची माहिती व्यापारी वाय.बी.चव्हाण यांनी दिली.
रताळ्याचा भाव घसरल्याने त्याचा फटका शेतकऱ्याला बसला आहे.पावसाची चिन्हे असल्याने शेतकऱ्यांनी रताळी काढण्याची घाई केली.त्यामुळे आवक मोठ्या प्रमाणावर झाली.सध्याचा दर आहे त्यातून शेतकऱ्याचा उत्पादन खर्च देखील निघत नाही अशी कृष्णा गुरव या शेतकऱ्याने व्यक्त केली.