13 दिवसानंतर सीएम मिळाले
फडणवीस तिसऱ्यांदा मुख्यमंत्रीपदी
मुंबई:अखेर निवडणूक निकालाच्या 13 दिवसानंतर महाराष्ट्राला देवेंद्र फडणवीस यांच्या रूपाने नवीन मुख्यमंत्री मिळाले आहेत. ते महाराष्ट्राचे तिसऱ्यांदा मुख्यमंत्री म्हणून विराजमान झाले आहेत. दादर मुंबई येथील आझाद मैदानावर गुरुवार पाच डिसेंबर रोजी नव्या मुख्यमंत्र्यांचा त्याचबरोबर नूतन उपमुख्यमंत्र्यांचा शपथविधी सोहळा संपन्न झाला. या शपथविधी सोहळ्याला राजकीय नेते , बॉलिवूड सेलिब्रिटी, उद्योजक तसेच विविध क्षेत्रातील मान्यवरांनी उपस्थिती लावली होती.
महाराष्ट्र विधानसभेसाठी 20 नोव्हेंबर रोजी मतदान झाले होते. 23 नोव्हेंबर रोजी मतमोजणी होऊन निकाल लागला होता. एकूण 288 जागांपैकी महायुतीला २३० जागांवर दणदणीत विजय प्राप्त झाला होता. यामध्ये भाजपाने सर्वाधिक 132 जागा जिंकल्या होत्या. एकनाथ शिंदे शिवसेना गटाने 57 आणि अजित पवार राष्ट्रवादी काँग्रेसने 41 जागांवर विजय मिळवला होता. अशी भक्कम आघाडी असून आणि स्पष्ट बहुमत असून देखील महायुतीला तब्बल तेरा दिवस मुख्यमंत्री आणि सरकार बनवायला लागले होते. यावरून राजकारणामध्ये सत्ता आणि खुर्चीचा खेळ किती महत्त्वाचा असल्याचे आपल्याला स्पष्ट दिसून येते. या दरम्यान माजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री तरी होणार किंवा गृहमंत्री पद घेणार अशा चर्चांना उधाण आले होते. त्यामुळे महाराष्ट्राचा नवा मुख्यमंत्री कोण होणार ? याची उत्सुकता महाराष्ट्रातील जनतेबरोबरच देशातील तमाम नागरिकांना लागली होती. अखेर तेरा दिवसाच्या प्रतीक्षेनंतर देवेंद्र फडणवीस यांच्या रूपाने महाराष्ट्राला नवा कर्तबगार मुख्यमंत्री मिळाला आहे. पण त्यांच्या पुढील वाटचालीमध्ये अनेक आव्हाने असून ते या आव्हानांना कसे तोंड देतात हे पाहावे लागेल.
उपमुख्यमंत्रीपदी शिंदे,पवार
होय नाही , होय नाही करत एकनाथ शिंदे यांनी शेवटी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. त्याचबरोबर अजित पवार यांनी देखील उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली आहे. या तिघांनाही राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन यांनी शपथ दिली.
या शपथविधी समारंभाला केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू, बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार, केंद्रीय मंत्री जे पी नड्डा, केंद्रीय रस्ते आणि वाहतूक मंत्री नितीन गडकरी, शिवराज सिंग चव्हाण, गुजरातचे मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल, शिवराज सिंग चव्हाण, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, केंद्रीय मंत्री रामदास आठवले, केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन, केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव, केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान, केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया, किरण रिजीजू, चिराग पासवान, आसामचे मुख्यमंत्री हेमंत शर्मा, अरुणाचल प्रदेशचे मुख्यमंत्री पेमा खंडू, उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी, अभिनेता सलमान खान , शाहरुख खान, रणवीर सिंह, माजी क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर बहुसंख्येने उपस्थित होते. 22 राज्यांचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री या सोहळ्याला उपस्थित होते.