थंडी वाढू लागली
बेळगाव:
यावर्षी परतीच्या पावसाने ऑक्टोबर आणि नोव्हेंबर महिन्यामध्ये धुमाकूळ घातला. त्यामुळे थंडीचा कडाका लवकर जाणवला नाही. आता मात्र थंडीने आपले रुद्र रूप धारण केले आहे. गुलाबी थंडीचा कडाका वाढतच चालला आहे. जागोजागी शेकोट्या पेटल्याचे चित्र पहावयास मिळत आहे. तसेच उबदार , गरम कपड्यांच्या मागणीमध्ये दिवसेंदिवस मोठी वाढ होत असल्याचे दिसत आहे.
बेळगाव परिसरामध्ये दुपारच्या वेळेला ऊन, सकाळी आणि रात्रीच्या वेळेला कडाक्याची थंडी पडत आहे. त्यामुळे पहाटेच्या वेळेला फिरायला जाणाऱ्यांच्या संख्येमध्ये सुद्धा घट झाली आहे. या थंडीपासून बचाव करण्यासाठी नागरिक स्वेटर, कानटोपी , मफलर, हॅन्ड ग्लोज, जॅकेट यांसारख्या उबदार आणि गरम कपड्यांचा वापर करत असताना दिसत आहेत.
बेळगावचा पारा कमालीचा घटल्याचा दिसत आहे. शहरातील कडोलकर गल्ली, गणपती गल्ली , किर्लोस्कर रोड, रामदेव गल्ली , खडे बाजार, टिळक चौक व अन्य भागांमध्ये उबदार कपडे विक्रीला मोठ्या प्रमाणावर आल्याचे दिसत आहे.
गावागावात, गल्ली गल्लीत कोपऱ्या कोपऱ्यावर शेकोट्या पेटल्याचे चित्र दिसत आहे. थंडीचा पारा सहन झालेले नागरिक आजारी पडू लागले आहेत. त्यामुळे दवाखान्यामध्ये रुग्णांची संख्या वाढलेली दिसत आहे. दिवसेंदिवस थंडीच्या प्रमाणात मोठी वाढ होत आहे. चालू वर्षी पर्जन्यमान अधिक झाल्यामुळे यावर्षी थंडीचे प्रमाण अधिक राहणार असल्याचे नागरिकांतून बोलले जात आहे.
वाढत्या थंडीमुळे चिकन , मटण, अंडी याच्या मागणीमध्ये मोठी वाढ झाल्याचे दिसत आहे. अंड्याच्या दरामध्ये वाढ झाली आहे. असे असले तरी त्याच्या मागणीमध्ये देखील वाढ होतच आहे.