केशवनगरमध्ये दिवसाही पथदीप सुरूच
बेळगाव:
केशवनगर , वडगाव येथील पथदीप दिवसाही सुरूच होते. सार्वजनिक विजेची एकप्रकारे उधळपट्टी सुरू असल्याचे चित्र येथे पाहावयास मिळाले. संबंधित लाईनमन याने सदर पथदीप वेळेत बंद करणे गरजेचे असताना ते बंद केले नाहीत. त्यामुळे सार्वजनिक विजेची उधळपट्टी सुरू आहे. याकडे वीज खाते लक्ष देईल काय, अशी विचारणा नागरिक करत आहेत.
कधी कधी दुरुस्ती कामाच्या नावाखाली वीज पुरवठा खंडित करण्यात येतो. तसेच याउलट गरज नसतानाही भरदिवसा पथदीप सुरूच ठेवले जात आहेत. हेस्कॉमच्या या अनागोंदी कारभारावर नागरिक तीव्र संताप व्यक्त करत आहेत. कधी कधी तर ऐन सणाच्या दरम्यान अचानकपणे वीज पुरवठा खंडित करण्यात येतो.
त्यामुळे सर्वांचीच गैरसोय होते. याकडे हेस्कॉमने जाणीवपूर्वक लक्ष देणे गरजेचे असल्याचे नागरिकांतून बोलले जात आहे. आता तर हिवाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर दुरुस्ती कामानिमित्त दिवसभर वीज पुरवठा खंडित केला जात आहे. बुधवारी संपूर्ण दिवसभर वीज पुरवठा खंडित करण्यात आला होता. त्यामुळे अनेकांनी आपली दुकाने बंद ठेवली होती. दुसरीकडे भर दिवसाही पथदीप सुरूच ठेवून सार्वजनिक विजेची उधळपट्टी करण्यात येत आहे.