बेळगाव:येळ्ळूर – वडगाव मुख्य रस्ता अत्यंत खराब झाला आहे. रस्त्यावर मोठ्या प्रमाणावर खड्डेच खड्डे पडलेले आहेत. त्यामुळे रस्ता दुरुस्तीची किंवा पॅचवर्कची मागणी नागरिकातून वारंवार करण्यात येत होती. याची दखल घेऊन सार्वजनिक बांधकाम खात्याच्यावतीने रस्त्याच्या पॅचवर्कच्या कामाला सुरुवात करण्यात आली आहे.
बेळगाव शहराकडे येण्यासाठी येळ्ळूर – वडगाव हा मुख्य रस्ता आहे. या रस्त्यावरून दररोज वाहनांची मोठ्या प्रमाणावर ये- जा होत असते. त्याचप्रमाणे दुचाकी , चार चाकी तसेच वाळू, विटा व अन्य अवजड वाहनांची वाहतूक देखील या रस्त्यावरून नियमित होत असते.
यावर्षी पावसाचे प्रमाण जास्त झाल्यामुळे रस्त्यावरील खड्ड्यांवर पावसाचे पाणी साचून राहत होते. त्यामुळे वाहन चालकांना खड्ड्याचा अंदाज येत नव्हता. त्यामुळे किरकोळ अपघाताच्या घटनाही घडल्या आहेत. नागरिकांनी वारंवार रस्ता दुरुस्तीची मागणी केली होती. याकडे गांभीर्याने लक्ष देऊन सार्वजनिक बांधकाम खात्याच्या वतीने वडगाव येळ्ळूर रस्त्याच्या पॅचवर्कच्या कामाला प्रारंभ करण्यात आला आहे.
मागील काही दिवसांपासून रस्त्याच्या पॅचवर्कच्या कामाला सुरुवात झाली आहे. खडी घालून त्याच्यावर डांबर ओतून नंतर रोलर फिरवण्यात येत आहे. मात्र काही ठिकाणी फक्त खडीच घातलेली आहे त्याच्यावर डांबर ओतलेले नाही किंवा रोलिंग केलेले नाही. त्यामुळे तेथून वाहन गेल्यानंतर खडी उडून बाहेर येत आहे.
त्याचप्रमाणे वाहन देखील घसरून पडण्याची शक्यता निर्माण झाली आहे. तेव्हा खडी घातल्यानंतर त्याच्यावर डांबरीकरण करून रोलिंग व्यवस्थित करावे अशी मागणी समस्त नागरिक करत आहेत. काम देखील अत्यंत संथ गतीने सुरू आहे. काम लवकरात लवकर पूर्ण करावे अशी मागणी देखील नागरिक करत आहेत. गणेश उत्सवापूर्वी येळ्ळूर ग्रामपंचायतच्या काही सदस्यांनी या खड्ड्यांमध्ये खडी मुरूम टाकून खड्डे भरण्याचा प्रयत्न केला होता. त्यामुळे ग्रामस्थांमधून समाधान व्यक्त करण्यात आले होते.