रात्रीस खेळ चाले!
बेळगाव:
सध्या बेळगाव तालुक्यामध्ये रात्रीच्या वेळेला विविध खेळांचे आयोजन करण्याची पद्धत मोठ्या पद्धतीने फोफावत आहे. यात खासकरून हाफ पीच क्रिकेट, हॉलीबॉल , कबड्डी, खोखो यासारख्या खेळांचा समावेश आहे. या स्पर्धा रात्री उशिरापर्यंत सुरू राहत असल्यामुळे याचा त्रास आजूबाजूच्या परिसरातील नागरिकांना होत आहे. क्रिकेट स्पर्धेमध्ये खासकरून वापरण्यात येणाऱ्या साऊंड सिस्टिमचा त्रास येथील नागरिकांना होत असल्याचे निदर्शनास येत आहे. एखाद्या फलंदाजाने चौकार किंवा षटकार मारल्यानंतर किंवा एखाद्या गोलंदाजाने विकेट घेतल्यानंतर ज्या पद्धतीने साऊंड सिस्टिमचा वापर केला जातो त्याचा नाहक त्रास त्या परिसरातील नागरिकांना विशेष करून होत आहे.
या स्पर्धा उशिरा रात्रीपर्यंत सुरू असतात. रात्रीच्या वेळी वातावरण शांत असते.
अशावेळी साऊंड सिस्टिमचा कर्ण कर्कश आवाज झाल्याने खास करून वयस्कर नागरिक , आजारी व्यक्ती , प्रसुती होणाऱ्या आणि प्रसूती झालेल्या महिलांना तसेच लहान बालकांना खूप त्रास होतो. त्यामुळे काहींच्या कानावर विपरीत परिणाम झाल्याच्या घटनाही घडल्या आहेत. कर्णबधिरताही त्यांना सोसावी लागली आहे. त्याचप्रमाणे शेजारी असलेल्या इमारतींच्या भिंतींवर त्याचा परिणाम झाल्याचे दिसत आहे.
अशा स्पर्धा रात्री घेण्याऐवजी दिवसा आयोजित करण्यात याव्यात , अशी मागणी जागरूक नागरिक करत आहेत. त्याचबरोबर साऊंड सिस्टिमवर देखील आवाजाची मर्यादा घालावी अशी मागणी करण्यात येत आहे.
रात्री उशिरापर्यंत खेळ सुरू राहत असल्यामुळे झोपमोड होत आहे. झोप पुरेशी होत नसल्यामुळे त्याचा आरोग्यावर सुद्धा परिणाम होत असल्याचे सांगितले जात आहे. काही वेळेला तर सामना जिंकल्यानंतर विजेत्या संघाकडून फटाक्यांची मोठ्या प्रमाणावर आतषबाजी देखील करण्यात येत आहे. त्यामुळे याला कुठेतरी आवाजाची , वेळेची मर्यादा घालावी अशी मागणीदेखील करण्यात येत आहे. एकूणच रात्रीच्या स्पर्धांवर योग्य बंधने असावीत, अशी मागणी जागरूक नागरिकांनी केली आहे.