बेळगावमध्ये अंगावरील कपडे फाटेपर्यंत महिलेला मारहाण
बेळगाव:शहरांमध्ये माणुसकीला लाजवेल अशी अमानुष घटना नुकतीच घडली. शहरातील वडरवाडी येथील एका महिलेची जमीन बळकावण्यासाठी तसेच तिच्यावर वेश्याव्यवसायाचा आरोप करत तेथील शेजाऱ्यांनी त्या महिलेला तसेच तिच्या आईला आणि मुलीला अंगावरील कपडे फाटेपर्यंत मारहाण केली आहे.
बेळगाव शहरातील माळ मारुती पोलीस ठाण्याच्या हद्दीतील वडरवाडी येथे ही घटना घडली आहे. याबाबत संबंधित महिलेने पत्रकारांना आपली व्यथा सांगताना सांगितले की, तेथील काही नागरिकांनी देवस्थानासाठी तिच्या घराची जमीन बळकवण्याच्या हेतूने तिला आणि तिच्या आईवर वेश्याव्यवसाचा खोटा आरोप लावून कपडे फाटेपर्यंत मारहाण केली आहे. तिच्या घराच्या जागेवर कब्जा करण्यासाठी हा कट रचण्यात आल्याचे तिने सांगितले. सतत खोटे आरोप लावून कुटुंबाला त्रास देण्यात येत असल्याचेही ती म्हणाली. अंगावरील कपडे फाटेपर्यंत तिला, तिच्या आईला आणि मुलीला मारहाण करण्यात आल्यामुळे संपूर्ण कुटुंब अत्यंत घाबरल्याचे तिने सांगितले. तिच्या कुटुंबामध्ये फक्त महिलाच राहतात. या हल्ल्यामध्ये इंद्रा अष्टेकर, हुवाप्पा अष्टेकर मनीकंट अष्टेकर या संशयतांचा सहभाग असल्याचा आरोप करण्यात आला आहे. या फिर्यादीमध्ये म्हटले आहे की, अष्टेकर यांनी त्या महिलेच्या आईला घराबाहेर फरपटत नेऊन मारहाण केली आहे. पोलिसांकडे वारंवार तक्रार करूनही पोलिसांनी त्याकडे दुर्लक्ष केल्याचे म्हटले आहे. पोलिसांनी स्थानिक पंचाबरोबर तडजोड करण्याचा सल्ला दिला होता असा आरोपी त्या पीडित महिलेकडून करण्यात आला आहे.
या घटनेची माहिती मिळताच बेळगाव उत्तरचे आमदार राजू शेठ यांनी घटनास्थळी भेट देऊन संबंधित महिला आणि कुटुंबियांना धीर दिला. तसेच संबंधितांवर योग्य कारवाई करण्यात येईल अशी आश्वासन दिले. पोलीस उपायुक्त रोहन जगदीश यांनीही पीडित महिलेच्या कुटुंबियांची भेट घेऊन हल्ला केलेल्या आरोपींना ताब्यात घेऊन त्यांची सखोल चौकशी सुरू केली आहे. सुमारे एक वर्षांपूर्वी वंटमुरी येथे घडलेली घटना ताजी झाली आहे. या घटनेनंतर समाजातील नागरिकांकडून अरे माणसा माणसा कधी होशील तू माणूस असे म्हटले जात आहे.