समुद्रात बुडून बेळगावच्या तरुणाचा मृत्यू
वेंगुर्ले – शिरोडा वेळागर येथील समुद्रात रविवारी आंघोळीसाठी उतरलेला बेळगाव येथील विनायक रमेश शिंदे (44) या पर्यटकाला पाण्याचा अंदाज न आल्याने समुद्राच्या पाण्यात बुडून मृत्यू झाला. ही घटना रविवारी सकाळी 10 वाजण्याच्या सुमारास घडली. सध्या दिवाळीची सुट्टी सुरू असल्याने बेळगाव येथील काही मित्र पर्यटनासाठी सिंधुदुर्गात आले होते.
हे सर्व सकाळी शिरोडा वेळागर येथील बीचवर पोहोचले. तेथील समुद्राच्या लाटा पाहून हे पाण्यात आंघोळीसाठी उतरले. मात्र यातील विनायक शिंदे हा पाण्याच्या प्रवाहामुळे पुढे गेला. किनाऱ्यापासून काही अंतरावरच पाण्यात बुडून त्याचा मृत्यू झाला. या बाबत शिरोडा पोलिसांना माहिती मिळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवला आहे.