बेळगाव :एक नोव्हेंबर हा काळा दिन सीमाभागात गांभीर्याने पाळण्यात येतो. गेल्या ६७ वर्षापासून हा काळा दिन आम्ही पाळत आलो आहोत आणि येणारा काळा दिन हाही आम्ही मोठ्या गांभीर्याने पाळणार आहोत. केंद्र सरकारचा निषेध म्हणून आम्ही हा दिन पाळतो, याची प्रशासनाने नोंद घ्यावी तसेच यासंदर्भात लोकशाही अधिकाराप्रमाणे सीमा बांधवांना काळा दिन आचरणाची अनुमती द्यावी अशी मागणी महाराष्ट्र एकिकरण समितीच्या वतीने करण्यात आली आहे. यासाठी
मंगळवारी जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांची भेट घेण्यात आली. एक नोव्हेंबर १९५६ रोजी त्यावेळच्या मुंबई प्रांतातील मराठी भाषिक भाग अन्यायाने त्यावेळच्या म्हैसूर व आताच्या कर्नाटक राज्यात डांबण्यात आला. सीमाभागात मोठा असंतोष माजला व
आजही अन्यायाने मराठी भाषिक कर्नाटकाच्या कानडी जोखडात पडून आहेत. तेव्हा केंद्र सरकारने मराठी भाषिकांची वेदना समजून घेऊन लवकरात हा सीमाभाग महाराष्ट्रात विलीन करावा, यासाठी लढा सुरू आहे. प्रशासनाने येणाऱ्या काळा दिनाच्या सायकल फेरीला परवानगी दिली जावी असे म्हणणे मांडण्यात आले. मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीचे कार्याध्यक्ष मनोहर किणेकर यांच्यासह माजी महापौर मालोजी अष्टेकर, प्रकाश मरगाळे, विकास कलघटगी यांच्यासह इतर सदस्य उपस्थित होते.