शेतकऱ्यांचा जिल्हाधिकारी कार्यालयावर चाबूक मोर्चा
स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांच्या नेतृत्वाखाली शेतकऱ्यांनी विविध मागण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयावर चाबूक मोर्चा काढला.
कर्नाटक राज्य रयत संघटना आणि स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या नेतृत्वाखाली हा मोर्चा काढण्यात आला होता.मोर्चाच्या अग्रभागी हातात चाबूक घेऊन शेतकरी सहभागी झाले होते. मलप्रभा साखर कारखान्याने 2017-2018 सालची उसाची थकबाकी त्वरित द्यावी.बेकायदेशीररीत्या गोदामात ठेवण्यात आलेल्या साखरेच्या दहा हजार हून अधिक क्विंटल साखरेची माहिती सरकारला देण्यात आलेली नाही.
ऊस तोडणीचे कंत्राट घेतलेल्या व्यक्तीने सहा कोटीहून अधिक रुपयांचा गैरव्यवहार केला आहे.याची चौकशी व्हावी अशी मागणी चाबूक मोर्चात सहभागी झालेल्या शेतकऱ्यांनी केली.आगामी हंगामात उसाला चांगला भाव द्यावा,दुष्काळामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना सरकारने त्वरित मदत द्यावी अशा मागण्या देखील शेतकऱ्यांनी केल्या.खांद्यावर हिरवे टॉवेल घेऊन आणि हातात वाळलेले ऊस घेऊन शेकडो शेतकरी जिल्हाधिकारी कार्यालयावर काढण्यात आलेल्या मोर्चात सहभागी झाले होते.