एकाची कोयत्याने वार करून हत्या
क्षुल्लक कारणावरून झालेल्या भांडणात एकाची कोयत्याने वार करून हत्या करण्यात आली.रविवारी रात्री ही घटना बेळगाव जिल्ह्यातील कित्तूर तालुक्यातील तिगडोळी गावात घडली आहे.मद्यधुंद स्थितीत असलेल्या विजय रामचंद्र आरेर (३२) या रेकॉर्डवरील गुंडाचे कल्लाप्पा क्यातेन्नवर (४८) याच्याशी क्षुल्लक कारणाने वाद झाला.नंतर विजय याने कल्लाप्पा यांच्यावर तलवारीने हल्ला केला.
नंतर कल्लाप्पा याने भरत हित्तलकेरी याच्या समवेत विजयवर कोयत्याने हल्ला केला.दोघांनी हल्ला केल्यामुळे विजयला स्वतःचा बचाव करण्यासाठी पळून जायला जमले नाही.कोयत्याने केलेल्या हल्ल्यामुळे विजय रक्तबंबाळ स्थितीत खाली पडला.नंतर पोलिसांनी विजयला उपचारासाठी बेळगावच्या जिल्हा रुग्णालयात दाखल केले पण उपचारा दरम्यान अती रक्तस्त्रावाने त्याचा मृत्यू झाला.
विजयने केलेल्या तलवारीच्या हल्ल्यात कल्लाप्पा यांच्या कानाला दुखापत झाली असून पाठीवर वार झाल्यानें जखमी झाला आहे.पोलिसांनी कल्लाप्पा याला धारवाड येथील सरकारी रुग्णालयात दाखल केले आहे. कित्तूर पोलिसात या घटनेची नोंद झाली आहे.