बेळगाव शहरातील नागरी वस्तीत सकाळी सकाळी कोल्ह्याने दर्शन दिल्याने तेथील नागरिकात घबराट पसरली होती.वनखाते आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी त्या परिसरात शोध मोहीम राबवून कोल्ह्याला पकडल्याने नागरिकांनी सुटकेचा निःश्वास सोडला.
शहरातील मध्यवस्तीत हुळबत्ते कॉलनी मध्ये एका घराच्या कंपाऊंड मध्ये कोल्हा आल्याचे काही जणांनी पाहिले.कोल्हा फिरत असल्याची माहिती कळताच तेथील जनतेत घबराट निर्माण झाली होती.कोल्हा फिरत असल्याचे नागरिकांनी वन खात्याला कळवल्यावर वन खात्याचे पथक जाळी आणि अन्य साहित्य घेऊन दाखल झाले.फेसबुक फ्रेंड्स सर्कल,श्री रामसेनाचे कार्यकर्ते देखील शोध मोहिमेत वन खात्याच्या कर्मचाऱ्यांच्या बरोबर सहभागी झाले होते.त्या परिसरात झाडे झुडपे असल्याने शोध घेणे अवघड होते.सकाळी नऊ वाजता शोध मोहीम सुरू झाली होती.अखेर एक वाजता कोल्ह्याला जाळीत पकडण्यात यश मिळाले.कोल्ह्याला वन खात्याच्या कर्मचाऱ्यांनी ताब्यात घेतले आहे.
अवधूत तुडेवकर, सौरभ सावंत, नरू निलजकर. संतोष दरेकर यांनी मित्रांच्या सहकार्याने कोल्ह्याला यशस्वीपणे पकडले.