तीन पोलिसांनी एका निष्पाप तरुणाला अमानुष मारहाण केल्याची घटना घडली असून त्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.मारहाण झालेल्या तरुणाचे नाव निरंजन रमेश चौगुले असे आहे.
बेळगावातील उद्यमबाग येथे ही मारहाणीची घटना मंगळवारी रात्री घडली आहे.रात्री हॉटेल मधून जेवणाचे पार्सल घेऊन घरी जाणाऱ्या तरुणाला तीन पोलिसांनी बेदम मारहाण करण्यास सुरुवात केली.पोलिसांनी मारहाण करताच त्या तरुणाने आपल्याला सोडा म्हणून हंबरडा फोडला .पण पोलिसांनी लाठी आणि लाथा घालून अक्षरशः त्या तरुणाला तुडवून काढले.
पोलिसांनी इतक्या निर्दयीपणे त्या तरुणाला मारहाण केली की लाठी देखील तुटली.नंतर त्या तरुणाचा मोबाईल आणि मोटार सायकल काढून घेऊन त्याला रस्त्याच्या कडेल टाकून पोलीस निघून गेले.पोलिसांनी जबर मारहाण केल्यामुळे त्या तरुणाला उठता देखील येत नव्हते.अखेर पहाटे उठून त्याने आपले घर गाठले.गुरुवारी सकाळी मारहाण झालेला तरुण उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात आला होता.त्यावेळी त्याने आपली कैफियत प्रसार माध्यमांच्या समोर मांडली.हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्या नंतर पोलीस आयुक्त एस.एन .सिध्दरामप्पा यांनी उद्यमबाग पोलीस स्थानकाला भेट देऊन घटनेची चौकशी केली.
आपल्याला अमानुष मारहाण करणाऱ्या पोलिसांवर कारवाई करावी अशी मागणी मारहाण झालेला तरुण निरंजन चौगुले याने केली आहे.