दमदार पावसामुळे नाले, ओढे व नद्या तुडुंब भरून आहेत वाहत
बेळगाव जिल्ह्यात बऱ्याच ठिकाणी गेल्या चोवीस तासापासून दमदार पाऊस सुरू असून अनेक नाले,ओढे आणि नद्या दुथडी भरून वाहत आहेत.
बेळगाव जिल्ह्यात सर्वाधिक पाऊस खानापूर तालुक्यात होतो.खानापूर तालुक्यात पावसाची जोरदार बॅटिंग सुरू असल्याने खानापूर हेम्माडगा मार्गावरील हालोत्री नदीवरील पूल पाण्याखाली गेला आहे.त्यामुळे पोलिसांनी बॅरिकेड्स लावून तेथील वाहतूक बंद केली आहे.गुंजी आणि परिसरातील पंचवीसहून अधिक गावांचा संपर्क तुटला आहे.खानापूर तालुक्याचा बराच भाग पश्चिम घाटात येतो.
मोठ्या प्रमाणावर पाऊस झाल्याने लोकांना पर्यायी मार्गाचा वापर करून गावाला ये जा करावे लागत आहे.खानापूर तालुक्यातील मलप्रभा नदीला पाणी मोठ्या प्रमाणावर आल्याने हब्बनहट्टी येथील हनुमान मंदिर पाण्याखाली गेले आहे.अनेक ठिकाणी जोरदार वाऱ्यामुळे विजेचे खांब आणि झाडे पडल्याच्या घटना घडल्या आहेत.