पोलिस हवालदाराचा हृदयघाताने मृत्यू
बेळगाव,:ता. ३ काकती पोलिस स्थानकाचे हवालदार मेहबूब राजमोहम्मद रेश्मी (वय २९) यांचे हृदयघाताने सोमवारी (ता. ३) निधन झाले. पोलिस ठाण्यात कर्तव्य बजावत असताना हवालदार मेहबूब यांच्या छातीत दुखू लागल्याने ते ठाण्यातून सकाळी घराकडे परतले.
काही वेळाने घरातून फोन आल्याने सहकाऱ्यांनी घराकडे जात मेहबूब यांना खासगी रुग्णालयात नेले. पण त्या ठिकाणी डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. मेहबूब यांची पत्नी देखील पोलीस असून, दोघेही पती-पत्नी काकती पोलिस ठाण्यात एकाच विभागात कार्यरत होते. मेहबूब यांच्या पत्नीला नुकतेच दुसरे अपत्य झाले आहे. मृत मेहबूब यांच्या मागे पत्नी, दोन मुलगे असा परिवार आहे. शहर पोलीस उपायुक्त पी. व्ही. स्नेहा, शेखर एच. टी, एसीपी नारायण बरमानी यांच्यासह वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी याबाबत शोक व्यक्त केला आहे.