‘वैश्विक हिंदु राष्ट्र महोत्सवा’ची यशस्वी सांगता !
धर्माचरण अन् धर्मरक्षणातून हिंदु राष्ट्राकडे वाटचाल!
प्रस्तावना : गोमंतकाच्या पावनभूमीत 16 ते 22 जून 2023 या कालावधीत अत्यंत उत्साहात पार पडलेल्या एकादश ‘अखिल भारतीय हिंदु राष्ट्र अधिवेशन’ अर्थात् ‘वैश्विक हिंदु राष्ट्र महोत्सवा’त देश-विदेशातील मान्यवरांनी विविध विषयांवर विचारमंथन केले. या महोत्सवात नेपाळसह भारताच्या 22 राज्यांतील 800 हिंदुत्वनिष्ठ सहभागी झाले होते. या महोत्सवात हिंदूंवर होणारे आघात आणि त्यांवरील उपाय, यांविषयी विस्तृत चर्चा करून अनेक ठराव संमत करण्यात आले. या महोत्सवाचा मागोवा…
1. राज्यघटनेतून ‘सेक्युलर’ शब्द वगळून ‘हिंदु राष्ट्र’ शब्द आणा !: कुठलेही राष्ट्र हे नियमांवर चालते. या नियमांनाच ‘राज्यघटना’ म्हणतात. यात बहुसंख्यांकांचे हित प्राधान्याने जपले जाते. भारतातील राज्यघटनेत मात्र तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी आणीबाणीच्या कालावधीत, म्हणजे वर्ष 1976 मध्ये संपूर्ण विरोधी पक्ष तुरुंगात असतांना ‘सेक्युलर’ आणि ‘सोशलिस्ट’ हे शब्द असंवैधानिकरित्या घुसडले आणि तेव्हापासून हिंदूंची खर्या अर्थाने परवड चालू झाली. या ‘सेक्युलर’पणाच्या नावाखाली एकीकडे हिंदूंचे नियोजनबद्धरित्या दमन करण्यात येत आहे, तर दुसरीकडे अल्पसंख्यांकांचे अनावश्यक लाड पुरवले जात आहेत. या कथित सेक्युलरवादामुळेच हिंदूंना लव्ह जिहाद, धर्मांतर, हिंदुत्वनिष्ठ नेत्यांच्या हत्या, हिंदूंचे विस्थापन, हिंदुविरोधी कायदे, तसेच हिंदु देवता, धर्मग्रंथ, संत, राष्ट्रपुरुष यांचा अवमान आदी आघातांना नित्य सामोरे जावे लागत आहे. त्यामुळेच देशातील बहुसंख्य हिंदूंना न्याय देण्यासाठी ‘सेक्युलर’ आणि ‘सोशलिस्ट’ हे शब्द वगळून त्या जागी ‘हिंदु राष्ट्र’ आणि ‘स्पिरिच्युअल’ शब्द जोडावेत आणि भारताला हिंदु राष्ट्र घोषित करावे, अशी आग्रही मागणी या महोत्सवात करण्यात आली. हिंदु राष्ट्राची मागणी ही राजकीय नसून धर्माधिष्ठित आणि विश्वकल्याणकारी आहे. भारत हे अनादि काळापासून हिंदु राष्ट्रच आहे. भारताला त्याची मूळ ओळख पुन्हा प्राप्त करून देणे आवश्यक आहे.
2. लोकसभा निवडणूक आणि हिंदु दबावगट : ‘हिंदूंनी राजकीय दृष्टीने जागृत न होणे, हे हिंदूंच्या पराभवाचे कारण आहे. आता हिंदूंना ‘विनामूल्य वीज’, ‘विनामूल्य प्रवास’ अशा भूलथापा नकोत, तर भारताला ‘हिंदु राष्ट्र’ घोषित करण्याची ठोस घोषणा हवी आहे. हा मुद्दा घोषणापत्रात घेऊन तो पूर्ण करण्याचे आश्वासन देणार्या पक्षालाच वर्ष 2024 मध्ये होणार्या लोकसभेच्या निवडणुकीत हिंदूंचा जाहीर पाठिंबा असेल, अशी भूमिका समस्त हिंदुत्वनिष्ठ संघटनांनी या महोत्सवात घेतली. कोणत्याही पक्षाचे सरकार असले, तरी अल्पसंख्यांक समुदाय निवडणुकीच्या पूर्वी आणि नंतरही दबावतंत्राचा वापर करून त्यांना अपेक्षित असे निर्णय होण्यासाठी सतत प्रयत्नशील असतो. अल्पसंख्यांकांप्रमाणे स्वार्थासाठी नव्हे, तर धर्म आणि राष्ट्र हिताचे निर्णय होण्यासाठी ‘हिंदु दबावगट’ निर्माण करण्याचे या प्रसंगी ठरवण्यात आले.
3. देशातील मंदिर संस्कृती वाढण्याचा निर्धार : मंदिरे ही सात्त्विकतेचा स्रोत आहेत. त्यासाठी मंदिरांचे पावित्र्य आणि संस्कृती जपणे आवश्यक आहे. या दृष्टीने अखिल भारतीय हिंदु राष्ट्र अधिवेशनाच्या पुढाकारातून महाराष्ट्रातील विविध मंदिरांच्या विश्वस्तांचा समावेश असलेल्या ‘महाराष्ट्र मंदिर महासंघा’ची स्थापन करण्यात आली. या महासंघाच्या वतीने अवघ्या 4 महिन्यांत राज्यातील 152 मंदिरांमध्ये वस्त्रसंहिता लागू करण्यात आली. अतिशय अल्प काळात या मोहिमेला इतका भरघोस प्रतिसाद मिळाला की, इतर राज्यांतील मोठमोठ्या मंदिरांनी त्यांच्या मंदिरांत स्वतःहूनच वस्त्रसंहिता लागू केली. इतकेच नव्हे, तर विदेशातील मंदिरांच्या विश्वस्तांनीही त्यांच्या मंदिरांत उत्स्फूर्तपणे वस्त्रसंहिता लागू केली आहे. लोकांचा धर्माचरणाकडे ओढा वाढत चालल्याचे हे द्योतक आहे. येत्या काळात देशातील विविध राज्यांत असे मंदिर महासंघ स्थापन करून 1 हजार 50 मंदिरांमध्ये वस्त्रसंहिता लागू करण्याचा निर्धार या वैश्विक हिंदु राष्ट्र महोत्सवात व्यक्त करण्यात आला. यासह सरकारीकरण झालेली सर्व मंदिरे, तसेच परकीय आक्रमकांनी उद्ध्वस्त केलेली सर्व मंदिरे मुक्त करून सरकारने ती भक्त्यांच्या स्वाधीन करावी, यासाठीचा लढा न्यायालयीन मार्गाने आणखीन तीव्र करण्याचे निश्चित करण्यात आले आहे.
4. ‘हिंदु राष्ट्र समन्वय समिती’ स्थापन करणार : अधिवेशनामध्ये हिंदु जनता आणि सरकार यांच्यामध्ये समन्वय राखण्यासाठी गावपातळीपासून राष्ट्रीय पातळीपर्यंत ‘हिंदु राष्ट्र समन्वय समिती’ स्थापन करण्याचे निश्चित करण्यात आले. यासह हिंदूंच्या रक्षणासाठी हिंदूंची सक्षम ‘इकोसिस्टिम’ असण्याची आवश्यकताही प्रतिपादित करण्यात आली.
5. धर्मांतरबंदी, गोहत्याबंदी कायद्याची मागणी : त्या जोडीला ‘लव्ह जिहाद’, धर्मांतर, गोहत्या यांविरोधात वर्षभर जागृतीपर उपक्रम राबवण्याचे, तसेच या संदर्भात कठोर कायदे करण्याची एकमुखी मागणी हिंदुत्वनिष्ठांनी केली. यासह ‘हलाल अर्थव्यवस्थे’च्या रूपात देशाच्या अर्थव्यवस्थेवर ओढवलेल्या गंभीर संकटावरही चर्चा झाली. हलाल जिहादच्या माध्यमातून हिंदूंकडून येणारा पैसा हा लव्ह जिहादमधील आरोपींना, 700 हून अधिक आतंकवाद्यांना, तसेच दंगलींतील आरोपींना सोडवण्यासाठी वापरला जात आहे. त्यामुळे हलाल सर्टिफिकेशनवर तात्काळ बंदी आणण्याची मागणी या अधिवेशनात करण्यात आली.
देशात समान नागरी कायदा आणण्यासाठी केंद्र सरकारकडून सूचना मागवण्यात आल्या आहेत, हे स्वागतार्ह आहे; मात्र ‘हम पांच हमारे पच्चीस’द्वारे लोकसंख्येची अनैसर्गिक वाढ होऊन अनेक समस्या निर्माण होत आहेत. ‘डेमोग्राफी’ हीच ‘डेमॉक्रसी’ झाली आहे. त्यामुळे समान नागरी कायद्याच्या जोडीला ‘लोकसंख्या नियंत्रण कायदा’ आणणेही तितकेच आवश्यक आहे, असे प्रतिपादन या अधिवेशनात करण्यात आले.
6. हिंदुत्वाच्या कार्याला साधनेची जोड : बहुतांश हिंदुत्वनिष्ठ राष्ट्र आणि धर्म यांवरील समस्याच्या विरोधात लढा देतांना तन, मन, धन आणि प्रसंगी प्राण अर्पण करण्यासही तयार असतात; पण आध्यात्मिक बळ कमी पडते. यावर उपाय म्हणून ‘सामर्थ्य आहे चळवळीचे । जो जो करील तयाचे । परंतु तेथे भगवंताचे । अधिष्ठान पाहिजे ।।’ या समर्थांच्या वचनाप्रमाणे प्रत्येक हिंदुत्वनिष्ठांनी साधना करण्याचा आणि इतरांना साधनेसाठी प्रेरित करण्याचा निर्धार व्यक्त केला आहे. ही अधिवेनातील महत्त्वपूर्ण बाब आहे.
7. हिंदुत्वनिष्ठांमध्ये निर्माण झाला संघभाव : भारताला हिंदु राष्ट्र बनवण्यासाठी हिंदूंनी आता कंबर कसली आहे. या वैश्विक हिंदु राष्ट्र महोत्सवाच्या माध्यमातून हिंदुत्वनिष्ठ संघटनांना वैचारिक आणि वैध कृती कार्यक्रमाची आश्वासक दिशा मिळते. या अधिवेशनाच्या निमित्ताने काश्मीरपासून कन्याकुमारीपर्यंत सर्वजण पद, पक्ष, जात, भाषा, प्रांत आदी भेद विसरून केवळ ‘हिंदू’ म्हणून एक होतात. त्यामुळे त्यांच्यात उत्तम संघभाव निर्माण झाला आहे. ही एकजुटीची वज्रमूठ भारताला लवकरच हिंदु राष्ट्र बनवेल, हे निश्चित!