मोफत बस सेवेचे चटके ऑटो रिक्षा चालकांना
द ऑटोरिक्षा ओनर्स अँड ड्रायव्हर्स असोसिएशनच्या वतीने आज जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले या निवेदनात रिक्षा चालकांनी महिलांची मोफत बस प्रवासाची योजना शहरापासून वीस ते पंचवीस किलोमीटर अंतर सोडून अमलात आणावी अशी मागणी केली. सदर निवेदन असोसिएशनचे अध्यक्ष मन्सूर अब्दुल गफार होणगेकर यांच्या नेतृत्वाखाली जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले.
काँग्रेस सरकारने जेव्हापासून महिलांकरिता मोफत बस सेवा सुरू केली आहे त्यामुळे शहरातील रिक्षा चालकांना याचा मोठा फटका बसत आहे. त्यामुळे ही बस सेवा शहराच्या बाहेर सुरू करावी अशी प्रमुख मागणी यावेळी रिक्षा चालकांनी केली त्याचबरोबर इन्शुरन्स मध्ये करण्यात आलेली दर वाढ लक्षात घेऊन ती रक्कम देखील कमी केली जावी अशी मागणी केली.
सदर योजना सुरू होण्याआधी रिक्षा चालकांचे दररोज 700 ते 800 रुपये कमाई होत होती. मात्र आताही योजना सुरू केली असल्याने रिक्षा चालकांना जेमतेम 200 ते 300 रुपये मिळत आहेत. त्यामुळे पोटाला खायचे काय असा प्रश्न उद्भवला असून सरकारने रिक्षाचालकांचे देखील मनाने ऐकून घ्यावे अशी मागणी यावेळी केली.
तसेच काही रिक्षा चालकांनी हप्त्यावर रिक्षा घेतली आहे त्यांना कर्जाचे हप्ते कसे व कुठून भरायचे आणि आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह कसा चालवायचा हा प्रश्न पडला असून या परिस्थितीकडे गांभीर्याने लक्ष द्यावे अशी मागणी करण्यात आली. तसेच येत्या आठ ते पंधरा दिवसात योग्य निर्णय घेतला नाही तर तीव्र आंदोलन छेडू असा इशारा देखील रिक्षा चालकांनी यावे दिला.