गृह जोती योजनेचा लाभ घेण्याकरिता नागरिकांची तुफान गर्दी
कर्नाटकात सत्तेवर येताच काँग्रेस सरकारने आपण दिलेल्या आश्वासनांची पूर्तता करण्यास प्रारंभ केला असून प्रत्येक घरी दोनशे युनिट वीज मोफत देण्याच्या भाग्यज्योती योजनेच्या नोंदणीला प्रारंभ झाला आहे.
कर्नाटकात रविवारी दुपारी तीन वाजता भाग्यज्योती योजनेचा लाभ घेण्यासाठी नोंदणी प्रारंभ करण्यात आली.रविवार सुट्टीचा दिवस असल्याने नोंदणी केंद्रावर तुरळक लोक दिसून आले पण सोमवारी मात्र भाग्यज्योती योजनेसाठी नोंदणी करण्यासाठी लोकांनी गर्दी केली होती.
बेळगाव वनच्या शहरातील चार केंद्रात तसेच त्यांच्या उप केंद्रात भाग्यज्योती योजनेसाठी नाव नोंदणी करण्यात येत आहे.याशिवाय विद्युत पुरवठा खात्याच्या कार्यालयात देखील नाव नोंदणी करण्याची व्यवस्था करण्यात आली आहे.नाव नोंदणी संपूर्ण राज्यात प्रारंभ करण्यात आली असून त्यामुळे नाव नोंदणी केंद्रावर बऱ्याच वेळा सर्व्हर डाऊन होण्याचे प्रकार घडत आहेत.तासनतास रांगेत उभारल्यामुळे लोक वैतागत असून सर्व्हर डाऊन मुळे त्यांच्या संतापात भर पडत आहे.ज्येष्ठ नागरिकांना नाव नोंदणी करण्यासाठी वेगळी व्यवस्था करावी.ज्येष्ठ नागरिकांना नाव नोंदणी करण्यासाठी तासनतास रांगेत थांबणे शक्य नाही त्यामुळे ज्येष्ठ नागरिकांसाठी वेगळी व्यवस्था करावी असे नाव नोंदणीसाठी रांगेत उभारलेल्या अनेक ज्येष्ठ नागरिकांनी प्रतिक्रिया व्यक्त केली.
भाग्यज्योती योजनेद्वारे दोनशे युनिट वीज मोफत देण्यात येणार आहे.भाड्याने राहत असलेले भाडेकरू देखील याचा लाभ घेऊ शकतात.सेवा सिंधू पोर्टलवर भाग्यज्योती योजनेचा लाभ घेण्यासाठी नाव नोंदणी करता येते.नाव नोंदणी करताना आधार कार्ड आणि विजेचे बिल सोबत नेणे आवश्यक आहे.बेळगाव वन केंद्रावर नाव नोंदणी साठी होणारी गर्दी पाहून आणखी अधिक काऊंटर नाव नोंदणी साठी उघडावेत अशी मागणी बेळगाव वन कर्मचाऱ्यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांच्याकडे केली आहे.