वीज दरवाढ विरोधात विणकर बांधवांनी काढला मोटारसायकल मोर्चा
वीज पुरवठा करणाऱ्या हेस्कॉमने वीज दरवाढ केल्यामुळे विणकर बांधवांनी मोटारसायकल मोर्चा काढून जिल्हाधिकारी कार्यालय आवारात धरणे धरले.
मे महिन्यापासून वीज पुरवठा करणाऱ्या हेस्कॉमने वीज दरात वाढ केली आहे.त्यामुळे सर्वसामान्य जनता , विणकर,उद्योजक यांना चांगलाच आर्थिक फटका बसला आहे.या वीज दरवाढीच्या विरोधात शेकडो विणकर बांधवांनी मोटार सायकल वरून जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला.
राणी कित्तुर चन्नमा चौकात त्यांनी काही काळ वाहतूक रोखून धरली.वीज दरवाढ रद्द करा मागणीचे फलक हातात घेऊन विणकर बांधव आंदोलनात सहभागी झाले होते.वीज दरवाढ केल्यामुळे विजेचे बिल दुप्पट येत आहे.त्यामुळे विणकर बांधव अडचणीत आले आहेत.वीजबिल भरणार नाही अशी भूमिका विणकर समाजाने घेतली असून वीज दरवाढ रद्द करा अशा मागणीचे निवेदन जिल्हाधिकारी आणि हेस्कॉम अधिकाऱ्यांना देण्यात आले.