मोफत बस प्रवासाला महिलांचा प्रचंड प्रतिसाद
कर्नाटकातील काँग्रेस सरकारने सुरू केलेल्या मोफत बस प्रवासाला महिलांचा प्रचंड प्रतिसाद मिळत आहे.कर्नाटकातील अनेक पर्यटन स्थळे आणि धार्मिक स्थळात महिलांची गर्दी दिसून येत आहे.अनेक भागात महिलांच्या गर्दीमुळे जादा बस सोडाव्या लागल्या. धर्मस्थळ,कुक्के सुब्रह्मण्य, शृंगेरी,उडुपी या धार्मिक स्थळांच्या ठिकाणी अचानक महिला भक्तांच्या संख्येत वाढ झाली आहे.
याशिवाय बेळगावसह राज्यातील अन्य गावातील बस स्थानकावर महिलांची गर्दी अधिक दिसून येत आहे.काही ठिकाणी बससाठी महिलांची वाढती गर्दी पाहून बंदोबस्तासाठी महिला पोलिसांना पाचारण करावे लागले.ओळखपत्र दाखवण्यासाठी देखील काही महिला कंडक्टर बरोबर हुज्जत घालत आहेत.मोफत बस प्रवास केवळ कर्नाटक राज्यात असून आंतरराज्य प्रवास मोफत नाही हे सांगताना कंडक्टर ची दमछाक होत आहे.मोफत बस सेवेमुळे रिक्षा आणि वडाप व्यवसायाला फटका बसला आहे.