*समाजासाठी काही तरी योगदान द्यायचं असेल, तर प्रशासकीय सेवेत रुजू व्हा : कवी प्रा. निलेश शिंदे* *
महात्मा गांधी वाचनालय आणि सामाजिक संस्थेतर्फे गुणगौरव सोहळा आणि मार्गदर्शनपर व्याख्यानाचा कार्यक्रम संपन्न : कावळेवाडी- बेळगुंदी पंचक्रोशीतील विद्यार्थ्यांचा सन्मान
बेळगांव तारीख ( 5 जून 2023 ) : जीवनात यशस्वी होण्याकरिता अतिशय खडतर प्रयत्न करणे अत्यंत गरजेचे आहे कोणत्या प्रकारचा मनात नेहमी ओळखता जिद्दीने देह घटनेसाठी प्रयत्न केले गेले पाहिजेत.
नियोजनपूर्वक अभ्यास करणं गरजेचं आव्हानात्मक क्षेत्र असलं तरी नियोजन करून अभ्यास केला तर स्पर्धा परीक्षांमध्ये यश मिळवणं कठीण नाही. कोणत्याही पदवी अभ्यासक्रमासोबत स्पर्धा परीक्षांचा अभ्यास सुरू केला तर पाया पक्का होतो आणि पुढे परीक्षेचा मुख्य अभ्यास करणं कठीण जात नाही. इतर सर्व परीक्षांचे पाठ्यपुस्तक तुमच्याकडे असतं. पण स्पर्धा परीक्षांसाठी असं कोणतही ठराविक पाठ्यपुस्तक नसतं. अभ्यासक्रम दिला जातो. तो विस्तृत स्वरुपात असतो. त्यात मोडणाऱ्या, त्याच्याशी निगडीत असलेल्या सर्व गोष्टी परीक्षेमध्ये विचारल्या जाऊ शकतात. तेव्हा जुन्या प्रश्नपत्रिका पाहा. कोणत्या प्रकारचे प्रश्न विचारले जातात ते समजून घ्या. समस्येवर विचार करायला शिका! स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करताना तुम्ही विचार कशा पद्धतीने करता हे महत्त्वाचं असतं. त्यामुळे आपल्या विचारांची बैठक पक्की करण्यासाठी प्रयत्न करा. आजुबाजूच्या सगळ्या घटनांचा, स्थित्यंतरांचा आपल्या अभ्यासाशी संबंध जोडता आला पाहिजे. अभ्यास कसा आणि कोणत्या गोष्टीचा करायचा याबरोबरच कोणत्या गोष्टींचा करायचा नाही, हे देखील लक्षात ठेवलं पाहिजे. देशपातळीवरच्या प्रश्नांकडे लक्ष वेधलं पाहिजे. संदर्भ शोधण्याकडे मन धावलं पाहिजे. वर्तमानपत्रात येणाऱ्या बातम्या वाचून सोडून देण्यापेक्षा त्या बातम्यांमागील संदर्भ शोधून आपला अभ्यास, स्मरणशक्ती आणि माहितीचा साठा वाढवण्यासाठी प्रयत्न केला पाहिजे. अभ्यास करा स्मार्टली! स्वतःच्या व्यक्तिमत्त्वाला घडवायचं असेल आणि समाजासाठी काही तरी योगदान द्यायचं असेल, तर प्रशासकीय सेवेशिवाय दुसरा कोणाताही पर्याय नाही. नियोजनबद्ध प्रयत्न करून आणि त्याला मेहनतीची जोड देऊन या क्षेत्रात यश मिळवता येतंच. प्रशासकीय अधिकाऱ्याला वेळ संपली असं सांगता येत नाही, त्यामुळे २४ तास काम करण्यासाठी तयारी हवी. समाजाची सेवा करण्यासाठी आपण ही परीक्षा देत आहोत हे लक्षात ठेवा. प्रचंड दडपणाखाली काम करण्याची वेळ तुमच्यावर येऊ शकते. त्यामुळे या आव्हानात्मक क्षेत्रात यायचं असेल तर मेहनत महत्त्वाची आहे. पण हे हार्ड वर्क स्मार्टपणे करणं गरजेचं आहे. अवांतर वाचन वाढवा! स्पर्धा परीक्षेची दुनिया खूप मोठी आहे. खूप खोलात जाऊन अभ्यास करावा लागतो. मागच्या परीक्षांचे पेपर मिळवून त्यांचं विश्लेषण करणं खूप महत्त्वाचं असतं. अवांतर वाचन वाढवलं पाहिजे. वर्तमानपत्राचं सखोल वाचन करणं फायदेशीर ठरु शकतं. मराठी बरोबरच रोज एक इंग्रजी वर्तमानपत्राचं वाचन अत्यावश्यक आहे. त्यासाठी पेपर वाचताना उत्तम डिक्शनरीचा वापर करा. हळूहळू शब्द संग्रह वाढेल आणि इंग्रजी भाषेचा बाऊ दूर होईल. वेबसाइटवर परीक्षा प्रकार, अभ्यासक्रम याची माहिती घ्या.
सुट्टीतील अभ्यासाचं नियोजन स्पर्धा परीक्षांमधून पुढे करिअर घडवायचं असेल तर सुट्टीमध्ये तुम्ही अनेक गोष्टी करू शकतात. सर्वात प्रथम या परीक्षेसाठी कोणत्या गोष्टी आवश्यक आहेत, याची एक यादी करा. युपीएससी, एमपीएससी, केपीएससी की स्टाफ सिलेक्शन कमिशनची परीक्षा द्यावी हे ठरवा. परीक्षेसाठी पात्रता काय असते याची माहिती करुन घ्या. कोणत्या वयोमर्यादेपर्यंत तुम्हाला ही परीक्षा देता येते, हे समजून घ्या. अभ्यासक्रम समजून घ्या. त्यानुसार प्राथमिक अभ्यास करण्यास सुरुवात करा आणि अभ्यासाचं वेळापत्रक तयार करा. मराठी आणि इंग्रजी वर्तमानपत्र वाचा. सखोल ज्ञान मिळवा! स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करताना फक्त वाचन करून विषयाचे ज्ञान घेणं पुरेसं नाही. शक्य असल्यास परिस्थिती समजून घेण्यासाठी एखाद्या भागाला भेट द्या. आपण वाचत असलेल्या गोष्टींवर कार्यरत असलेल्या संस्थाना भेटी द्या. त्यांच्या कार्यक्रमांना हजेरी लावा. स्पर्धा परीक्षा मार्गदर्शनासाठी विविध सेमिनार आयोजित केले जातात, त्यांना हजेरी लावा. तज्ज्ञांची भाषणं ऐका, त्यांची मत समजून घ्या आणि स्वतःचे मत बनवा. मिळालेल्या माहितीचा विचारपूर्वक अभ्यास करा. त्या घटनांचा, परिस्थितीचा, एखाद्या ठिकाणाचा पूर्ण माहिती मिळवा.
नैराश्य येता कामा नये! परीक्षेत पुढे जाता नाही आलं की, विद्यार्थ्यांना लगेच नैराश्य येतं. ते येत कामा नये. नाही तर नकारात्मक विचार विद्यार्थ्यांच्या मनात घर करून बसतात. आतापर्यंत दिलेल्या परीक्षेपेक्षा ही वेगळी परीक्षा आहे, हे लक्षात ठेवा. पदवी अभ्यासासोबत या स्पर्धा परीक्षांसोबत अभ्यास सुरू केला तर त्याची मदत होऊ शकते. परीक्षा कितीही वेळा देण्याची तयारी ठेवा. सातत्याने अभ्यास करत राहणं गरजेचं आहे. जिद्द हवी, संयम हवा. सातत्य, सकारात्मकता हवी. अपयश विसरून पुन्हा मेहनत घेण्याची तयारी हवी.
परीक्षेचं स्वरुप समजून घ्या! परीक्षेचं स्वरूप लक्षात घेणं गरजेचं आहे. पूर्व परीक्षेत बहुपर्यायी प्रश्न विचारले जातात. योग्य उत्तराचा पर्याय तुम्हाला शोधून द्यायचा असतो. तर मुख्य परीक्षेत तुम्हाला प्रश्नांची विश्लेषणात्मक उत्तरं द्यायची आहेत. त्यानंतरच मुलाखती देण्यास आपण पात्र असतो. पण स्पर्धा परीक्षा द्यायची असेल, तर विषयासंदर्भात संपूर्ण ज्ञान असणं गरजेचं आहे. कानावर पडणाऱ्या प्रत्येक शब्दाचा अर्थ समजून घेण्याकडे कल हवा. विश्लेषण देताना तुमचं मत त्यातून स्पष्ट झालं पाहिजे. घोका आणि ओका अशी ही परीक्षा नाही. टप्पे किती महत्त्वाचे? परीक्षा तीन टप्प्यांमध्ये होत असली तरी अभ्यास मात्र संपूर्ण करायचा आहे. एखाद्या टप्प्यात उत्तम यश मिळूनही पुन्हा पहिल्यापासून सुरू करायची वेळ येऊ शकते. तिन्ही टप्प्यांचा मिळून अभ्यास केलात, तर उत्तम भविष्य आहे. अशावेळी अभ्यास करताना नियोजन महत्त्वाचं असतं. स्पर्धा परीक्षांची तयारी केव्हा करावी? स्पर्धा परीक्षांची तयारी जितक्या लवकर कराल, तितकं उत्तमच. अनेकजण डिग्री घेऊन नंतर स्पर्धा परीक्षांचा अभ्यास सुरू करतात. त्यामुळे स्वरूप समजून घेऊन त्यानुसार अभ्यास करायला वेळ मिळतो. हातात डिग्री असल्याने जबाबदारी उचलण्याची गरज असते. डिग्रीनंतर अभ्यास करणं सोप्पं जातं. पण ही पदवी नाही तर यामुळे पद मिळतं, हे लक्षात ठेवा. कोणताही पदवी अभ्यासक्रम करत असताना हा अभ्यास सुरू ठेवा. अनेकजण एमबीए किंवा इंजिनीअरिंगसोबत हा अभ्यास करतात. बदल घडवून आणण्यासाठी… प्रशासकिय सेवेत रुजू होताना तुम्ही केवळ ते पद भूषवत नसतात, तर त्यासोबत आलेल्या विविध जबाबदाऱ्याही तुमच्यावर असतात. समाजात बदल घडवून आणायचा असेल तर त्यानुसार तयारीला लागा. त्यामुळे समाजातील कोणत्या गोष्टी तुम्हाला बदलता येतील, कोणते बदल तुम्हाला अपेक्षित आहेत, कोणत्या सुधारणा करणं या पदावर आल्यावर तुम्हाला शक्य आहेत, हे आधीच ठरवा. अनेक जण आपल्या अनुभवातून देशातल्या समस्या मांडणारी पुस्तकं लिहितात. त्या समस्यांवर त्यात चर्चा करतात आणि उत्तरंही शोधून काढतात. अशा वेळी ही पुस्तकं वाचून कोणत्या गोष्टी करणं शक्य आहे, हे तुम्ही तपासू शकता. तुमची स्वतःची मत तयार करू शकता. यातून तुम्ही भविष्यात घडवून आणणाऱ्या बदलांना योग्य दिशा मिळते.
* स्पर्धा परीक्षांच्या प्राथमिक अभ्यासासाठी कोणत्या पुस्तकांचा अभ्यास करावा? स्टेट बोर्डाची सहावी ते बारावीची पुस्तक वाचून काढा. त्यासोबत भूगोल, अर्थशास्त्राची पुस्तकं आणि विज्ञानातील संकल्पना समजावून घ्या. शालेय पुस्तकांचा अभ्यास करा. स्पर्धा परीक्षांच्या सुरुवातीच्या काळात एनएसआरटीची पुस्तक सगळ्यात आधी वाचा. * व्यक्तिमत्त्व विकास कसा करता येईल ? व्यक्तिमत्व विकास हा स्पर्धा परीक्षांसाठी खूप महत्त्वाचा आहे. आपल्या विचारांचा समतोल असायला हवा. स्वत:चे विश्लेषण करा. माझ्यामध्ये काय चांगलं आहे, काय वाईट आहे हे लिहून ठेवा आणि त्यानुसार स्वभावामध्ये बदल करा. व्यक्तिमत्व विकास घडवण्यासाठी खूप मेहनत घेण्याची तयारी ठेवा. * एमपीएससी आणि युपीएससीसाठी कोणती प्राथमिक तयारी करावी? वृतपत्र सखोल वाचा. मराठी आणि इंग्रजी वृत्तपत्र वाचा. वाचलेल्या बातम्यांवर विचार करा. अभ्यासक्रम लक्षात ठेवून त्यानुसार तयारी करा. * लेखन कौशल्य कशी विकसित करता येतील? स्पर्धा परीक्षेची उत्तरपत्रिका लिहिताना लेखन कौशल्य, बुलेट पोईंट्स, योग्य आणि ठराविक ठिकाणी आकृती काढाव्या. तुम्ही किती परिच्छेद लिहिता याला महत्त्व नसतं. लेखन कौशल्य हा खूप म्हत्वाचा भाग आहे. * स्पर्धा परीक्षांसाठी वयाची अट काय असते? एमपीएससीसाठी वयाची अट ही किमान १९ वर्षं आहे तर ३८ वर्षापर्यंत तुम्ही कितीही वेळा परीक्षा देऊ शकता. तसंच युपीएससीसाठी वयाची अट ही किमान २१ वर्षं तर वयाच्या ३२ पर्यंत तुम्ही ६ वेळा परीक्षा देऊ शकता. आरक्षणानुसार यामध्ये बदल होतात. हे आवर्जून करा * सर्वप्रथम अभ्यासक्रम पाठ करा. * मागच्या परीक्षांचे पेपर मिळवा. * वृत्तपत्र वाचताना मनोरंजन, गुन्हेगारी वृत्त वाचणं टाळा * सोशल मीडियाचा चांगला वापर करा * अभ्यासासाठी व्हॉट्स अॅपचा ग्रूप असावा अत्यंत प्रामाणिकपणाने अभ्यास केल्याने कोणतेही यश मिळण्यास अधिक वेळ लागणार नाही जेवढा मोठा संघर्ष तेवढे मोठे यश मिळू शकते. असे प्रतिपादन कवी प्राध्यापक निलेश शिंदे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन पर व्याख्यानात केले.
राष्ट्रपिता महात्मा गांधी सामाजिक संस्था व वाचनालय कावळेवाडी तालुका जिल्हा बेळगाव विद्यार्थी गुणगौरव समारंभ आणि मार्गदर्शनपर व्याख्यानाचा कार्यक्रम रविवार दिनांक 4 जून 2023 रोजी सकाळी 11 वाजता श्री विठ्ठल रुक्माई मंदिर येथे संपन्न झाला.
कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी हिंडलगा ग्रामपंचायतच्या सदस्या रेणू पांडुरंग गावडे ह्या होत्या. प्रमुख वक्त्या म्हणून टिळकवाडी बेळगाव येथील नेक्सस इन्स्टिट्यूट ऑफ हॉटेल मॅनेजमेंट च्या प्राचार्या प्रीती अर्जुन पाटील, प्रमूख वक्ते म्हणून कवी प्राध्यापक निलेश एन. शिंदे, तेजस्विनी कांबळे, आर.के. ओऊळकर उपस्थित होते. प्रमुख पाहुणे म्हणून माजी आमदार परशुरामभाऊ नंदिहळळी, सागर भोसले पवन कांबळे, संस्थेचे अध्यक्ष निवृत्त प्राचार्य वाय. पी. नाईक व्यासपीठावर उपस्थित होते.
यावेळी संत ज्ञानेश्वर फोटो पूजन बेळगांव जिल्हा पंचायत चे माजी सदस्य आणि शिक्षण आणि आरोग्य स्थायी समितीचे माजी अध्यक्ष मोहन मोरे यांच्या मातोश्री गंगुबाई मोरे यांच्या हस्ते करण्यात आले. महात्मा गांधी फोटो पूजन वनिता कणबरकर, सावित्रीबाई फुले फोटो पूजन प्रतीक्षा येळूरकर, छत्रपती शिवाजी महाराज फोटो पूजन प्राचार्य प्रीती अर्जुन पाटील यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी स्वस्तिक मोरे ( पैलवान ), निशिगंधा मोरे ( एम.कॉम.) , भारत मोरे (आर्मी ) यशवंत जाधव (सामाजिक कार्यकर्ते ) , कुमार बाचीकर (भारतीय नौदल ), स्वाती कांबळे , अविनाश कांबळे यांचा विशेष सत्कार करण्यात आला.
स्वागत संगीता कनबरकर यांनी केले. प्रास्ताविक संस्थेचे अध्यक्ष निवृत्त प्राचार्य वाय. पी. नाईक यांनी केले. प्रमुख पाहुण्यांचा परिचय आरती मोरे आणि कांचन सावंत यांनी करून दिला. यावेळी प्रमुख वक्त्या प्राचार्या प्रीती अर्जुन पाटील, प्रमूख वक्ते म्हणून कवी प्राध्यापक निलेश एन. शिंदे, तेजस्विनी कांबळे, आर.के. ओऊळकर यांची भाषणे झाली. कावळेवाडी – बेळगुंदी पंचक्रोशीतील एसएससी च्या परीक्षेत 80 टक्के पेक्षा अधिक गुण मिळवलेल्या विद्यार्थ्यांचा विषेश सत्कार करुणा भास्कळ ( बिजगर्णी ), प्रेरणा मुंजोळे ( बेळवटी ), सुदेश पाटील व रोहिणी पाटील ( कर्ले ) , निखिल कनबरकर ( विज्ञान विकास हायस्कूल महाद्वार रोड बेळगांव ), रूपाली मोटर ( रागास्कोप ), मंथन पाटील ( बेळगुंदी ) , गौरी शहापूरकर ( बेळगुंदी ), प्रणाली मोरे ( कावळेवाडी ) , हर्षद भैरटकर ( विद्या विकास हायस्कूल महाद्वार रोड) बेळगांव यांचा विशेष सत्कार करण्यात आला.
यावेळी केदारी कनबरकर, मोनाप्पा गावडे मोरे पांडुरंग सातेरी मोरे अविनाश कांबळे यशवंत मोरे , कल्लाप्पा येळूरकर, मुकुंद ओऊळकर, गोपाळ जाधव मंगांना कार्वेकर तसेच गावातील विविध मंडळाचे पदाधिकारी सदस्य ग्रामस्थ, प्राध्यापक, शिक्षक, विद्यार्थी, पालक आणि हितचिंतक शिक्षणप्रेमी आणि मोठ्या प्रमाणात रसिक उपस्थित होते. सूत्रसंचालन सुरज मोरे व दौलत कनबरकर यांनी केले. आभार ॲड. मनोहर मोरे यांनी मानले.